स्मार्टफोन खरेदी करताना नीट समजून घ्या हा फरक

दशहरा, दिवाळी निमित्त आता अनेक ऑनलाईन सेल्स धमाका सुरु झाला आहे आणि यंदाही या खरेदीत स्मार्टफोन खरेदी मोठ्या प्रमाणावर होणार असे संकेत मिळत आहेत. मोबाईलचा जमाना मागे पडून आता स्मार्टफोनचा जमाना आला असताना स्मार्टफोन खरेदी करताना काही बाबी ठळकपणे समजून घेणे आवश्यक आहे. त्यातील महत्वाची बाब आहे म्हणजे तुम्ही खरेदी करत आहात तो स्मार्टफोन वॉटरप्रूफ आहे, वॉटर रेझिस्टंट आहे की वॉटर रीपेलंट आहे हे माहिती करून घेणे. अनेकांना या तिन्हीमध्ये काय फरक आहे याची माहिती नसते आणि त्यामुळे नंतर पश्चाताप करण्याची पाळी येऊ शकते.

सर्वात प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की वॉटर रेझिस्टंट म्हणजे वॉटरप्रूफ नव्हे. रेझिस्टंटचा अर्थ अशा फोन मध्ये पाणी घुसणे अवघड असते. म्हणजे पाण्याचे काही थेंब फोन वर पडले तर फोन खराब होणार नाही. पण फोन पाण्यात पडला तरी खराब होणार नाही असा याचा अर्थ नाही.

वॉटर रेपेलंट फोन मध्ये फोनच्या आतून आणि बाहेरून एक विशिष्ट प्रकारचा पातळ लेप दिलेला असतो. हा लेप फोन मध्ये पाणी घुसू देत नाही. यासाठी बहुतेक कंपन्या हायड्रोफोबिक आवरण वापरतात. त्यामुळे फोनवर पाण्याचा परिणाम होत नाही पण या आवरणाला काही कारणाने तडा गेला तर फोन मध्ये पाणी जाऊ शकते. आज अनेक फोन वॉटरप्रूफ सर्टिफिकेट सह येतात. याचा अर्थ फोन पाण्यात सुद्धा सुरक्षित आहे असा आहे. या फोनच्या सहाय्याने तुम्ही पाण्यात सुद्धा फोटो काढू शकता.

एक केस आवर्जून सांगितली पाहिजे. ती म्हणजे गेल्या वर्षी अॅपलने आयफोन १२ वॉटर रेझिस्टंट असल्याचा केलेला दावा चुकीचा निघाल्याने इटली मध्ये अॅपलला करोडोंचा दंड भरावा लागला होता. यामुळे स्मार्टफोन खरेदी करताना आपण नक्की कोणत्या कॅटेगरी मधला फोन खरेदी करतोय याची पूर्ण माहिती घेऊन करणे योग्य.