भारतात आली ट्रायटनची इव्ही मॉडेल एच, फुलचार्ज मध्ये १२०० किमीचा दावा

देशात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढत चालली असून केंद्र सरकार कडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक कार्स भारतात पेश करत आहेत. अमेरिकन कंपनीने त्यांची ट्रायटन ई एसयूव्ही मॉडेल एच हैद्राबाद येथे पेश केली आहे. कंपनीचे भारतात पेश झालेले हे पहिले वाहन आहे.

ही एसयूव्ही अनेक कारणांनी वेगळी आहे. एच मॉडेल दिसायला आकर्षक आहेच पण गाडी इतकी मोठी आहे की त्यात आठ व्यक्ती आरामात प्रवास करू शकतात. शिवाय या एसयुव्हीची टोईंग क्षमता ६९८५ किलोची आहे म्हणजे हे वाहन इतके किलो वजन नेऊ शकते. सामान ठेवायला पुरेशी जागा दिली गेली आहे.

सात कलर ऑप्शन मध्ये ही एसयूव्ही मिळणार आहे. या गाडीला २०० केडब्ल्यूएच बॅटरी पॅक दिला गेला असून फुलचार्ज मध्ये ही गाडी १२०० किमी अंतर कापू शकते असा कंपनीचा दावा आहे. हा दावा खरा असेल तर भारतात १००० किमी रेंज वाली ही पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही ठरेल. यात हायपरचार्ज पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे हायपरचार्जच्या सहाय्याने पूर्ण गाडी अवघ्या दोन तासात पूर्ण चार्ज होऊ शकते. तिला ० ते १०० किमीचा वेग घेण्यास २.९ सेकंद लागतात. कार उत्पादकांनी त्यांना भारतातून आत्ताच २ ते ४ अब्ज रकमेच्या ऑर्डर मिळाल्याचा दावा केला आहे. ही एसयुव्ही अवघ्या १८ महिन्यात तयार केली गेल्याचे समजते.

या एसयुव्हीचे प्रीबुकिंग ५ हजार डॉलर्स भरून करता येणार असून बुकिंग फायनलायझेशन साठी आठवड्याच्या आत १३५००० डॉलर्स म्हणजे १ कोटी ३ लाख रुपये भरावे लागणार आहेत.