आजच्या जागतिक दृष्टीदिनासाठी ‘लव युवर आईज’ थीम
१४ ऑक्टोबर हा दिवस जागतिक दृष्टीदिन म्हणून साजरा होत असून यावर्षीसाठी ‘लव युअर आईज’ थीम ठरविली गेली आहे. करोना महामारीचा भर थोडा ओसरला असतानाच ब्लॅक फंगस डोळ्याचा नवा शत्रू म्हणून समोर आला आहे. त्यात ऑनलाईन ऑफिस, खरेद्या व अन्य अनेक कारणांनी स्क्रीनसमोर राहण्याचा वेळ वाढला असल्याने डोळ्यांचे त्रास वाढलेले दिसून येत आहेत. आपल्याला सप्तरंगी दुनियेचे दर्शन घडविणारे डोळे आरोग्यपूर्ण राहावेत म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने ‘लव युअर आईज’ ही थीम यंदाच्या जागतिक दृष्टी दिवसासाठी निश्चित केली आहे.
डोळे दमणे, आग, जळजळ होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, जवळचे किंवा दूरचे अस्पष्ट दिसणे, डोळे कोरडे पडणे, कमी उजेडात न दिसणे, धुरकट दिसणे, डोळ्यांना खाज येणे, एका वस्तूच्या जागी दोन वस्तू दिसणे ही डोळे बिघडल्याची लक्षणे आहेत. पण हे धोक्याचे संकेत लोक गंभीरपणे घेत नाहीत असे अकडेवारी सांगते. भारतात सफेद मोतीबिंदू मुळे दृष्टी जाण्याचे प्रमाण मोठे आहे. पण वेळेवर काळजी घेतली तर हा धोका टाळता येतो.
गेल्या चाळीस वर्षाच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की शहरी भागात १०० मधील १२ ते १३ मुलाना चष्मा वापरावा लागतो आहे. ग्रामीण भागात ही टक्केवारी ८ आहे. डोळ्यांना गंभीर संक्रमण, दुखापत होणे, पोषण पुरेसे न होणे यामुळे कॉर्निल अंधपणा येऊ शकतो आणि त्याचा इलाज नेत्ररोपण हाच आहे. त्यासाठी भारतात दरवर्षी दोन लाख नेत्रदात्यांची गरज आहे मात्र प्रत्यक्षात ५० ते ६० हजारच नेत्र मिळू शकतात. त्यातील ४० टक्केच प्रत्यारोपण करण्यायोग्य असतात असे समजते. दरवर्षी सरासरी ५० हजार अंध मुले जन्माला येतात असेही आकडेवारी सांगते.
जगात ८० टक्के लोकांना नेत्रविकार आहेत मात्र त्यातील बरेचसे चष्मा वापरून ठीक होणारे आहेत. संगणक, टीव्ही, मोबाईल आणि अन्य स्क्रीनचा वापर करणाऱ्यांनी २०-२०-२० हा फॉर्म्युला वापरला तर डोळ्यांचे आरोग्य राखता येते. म्हणजे दर वीस मिनिटांनी, स्क्रीन पासून २० सेकंदासाठी २० फुट दूर जाणे. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो. करोना काळात २७.५ कोटी लोकांची नजर कमजोर झाली असून त्यात मधुमेहीचे प्रमाण जास्त आहे. डोळ्याचे आरोग्य राखण्यासाठी डोळ्यांना पुरेशी विश्रांती, डोळ्यांची स्वच्छता हवीच पण आहारात ए व्हिटामिनचा वापर पुरेश्या प्रमाणात हवा. गाजर, पालेभाज्या, अंडी यातून हे जीवनसत्व मिळू शकते.