रत्नागिरीच्या आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरणार – राजेश टोपे


मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरल्या जातील, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा परिषदेस सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 31 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी टोपे बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात टोपे मंत्रालयातून सहभागी झाले.

यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. सार्वजनिक आरोग्य मंत्री टोपे म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. यासाठी राज्यात आतापर्यंत एक हजार रुग्णवाहिका घेण्यात आल्या. त्यापैकी 31 रुग्णवाहिका रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत देण्यात येत आहेत. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी विशेष मदत होईल.

रुग्णवाहिकांमुळे अर्भक-मृत्यू दर आणि माता मृत्यू दर कमी होण्यात मदत होईल. रुग्णवाहिकांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागातील गर्भवतींचा संस्थात्मक प्रसूती होईल, याकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, अशा सूचना टोपे यांनी दिल्या. लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी राज्य शासनाने मिशन कवच कुंडले अभियानात रत्नागिरी जिल्ह्यात जास्त जास्त लसीकरण करण्यासाठी रुग्णांची माहिती संकलित करुन ठेवावी, अशा सूचनाही टोपे यांनी दिल्या.