‘उमेद’ अभियानाअंर्तगत महिला बचतगटांना ‘गोट बँके’चा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा – यशोमती ठाकूर


मुंबई : ग्रामीण भागात ‘आमुलाग्र’ आणि ‘क्रांतीकारी’ बदल घडवून आणणारा ‘गोट बँक हा प्रयोग आहे. यामुळे ग्रामीण भागात विकास आणि स्वयंपूर्णतेचे एक नवे पर्व सुरू होईल. बचतगटांतील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी ‘गोट बँक’ हा प्रयोग राबविला जात असून महिला आर्थिक विकास महामंडळाबरोबरच उमेद अभियानाअंर्तगत महिला बचतगटांना गोट बँकेचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे मत महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

राज्यात गोट बँक उपक्रमाबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, गोट बँकेचे संचालक नरेश देशमुख, माजी जिल्हा परिषद सभापती जयवंतराव देशमुख, गोट बँकेचे ट्रस्टी अभिजीत देशमुख, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी जितेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून गोट बँक हा उपक्रम लोकाभिमुख करण्याचा शासनाचा मानस आहे. अर्थशास्त्रातल्या ‘कंपाऊंडींग’च्या सुत्रानूसार ‘गोट बँक ही संकल्पना आहे. ‘गोट बँक ऑफ कारखेडा’चा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला आहे.

ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, एखाद्या गावात गोट बँक स्थापन केल्यानंतर या संकल्पनेचे दृष्य परिणाम दाखविण्यासाठी त्यांना कारखेडासारखे कामाचे ‘मॉडेल’ उभे करणे आवश्यक आहे. ‘गोट बँके’च्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक क्रांती होईल. उमेद अभियानाअंर्तगत महिला बचत गट समुहाचा गोट बँकेत सहभाग व्हावा, असेही मुश्रीफ म्हणाले.