पाकिस्तानला लागले भिकेचे डोहाळे; जगातील सर्वात मोठ्या १० कर्जदार देशांमध्ये समावेश


लाहोर – इतर देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज घेऊन आपली अर्थव्यवस्था चालवणाऱ्या पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. जागतिक बँकेने जारी केलेल्या अहवालानुसार, कोरोनामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे आणि आता जगातील सर्वात मोठ्या १० कर्जदार देशांपैकी एक पाकिस्तान बनला आहे. त्याचबरोबर पाकिस्तान आता डेट सर्व्हिस सस्पेंशन इनिशिएटिव्हच्या कक्षेत आल्यामुळे त्यांना परदेशी कर्ज मिळवणे देखील कठीण झाले आहे.

सोमवारी जागतिक बँकेने जारी केलेल्या ‘आंतरराष्ट्रीय कर्ज आकडेवारी २०२२’ चा हवाला देत द न्यूज इंटरनॅशनलने म्हटले आहे की, मोठ्या कर्जदारांसह डीएसएसआय अंतर्गत देशांना मिळणाऱ्या कर्जाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे. १० सर्वात मोठ्या जेडीएसआय कर्जदारांचे एकूण बाह्य कर्ज वर्ष २०२० च्या अखेरीस ५०९ अब्ज डॉलर होते, वर्ष २०१९ च्या तुलनेत जे १२ टक्के अधिक होते आणि डीएसएसआयने व्यापलेल्या सर्व देशांच्या एकूण परकीय कर्जाच्या ५९ टक्के होते.

जगातील १० सर्वात मोठ्या विदेशी कर्जदार देशांमध्ये अंगोला, बांगलादेश, इथोपिया, घाना, केनिया, मंगोलिया, नायजेरिया, पाकिस्तान, उझबेकिस्तान आणि झांबिया या देशांचा समावेश आहे. डीएसएसआयच्या कार्यक्षेत्रात असलेल्या या देशांचा असुरक्षित विदेशी कर्जांमध्ये २०२० च्या अखेरीस सुमारे ६५ टक्के वाटा होता. या देशांना वेगवेगळ्या दराने परदेशी कर्ज देण्यात आले. तसेच पाकिस्तानवर असलेल्या कर्जामध्ये ४० टक्के कर्ज फक्त इम्रान खान सरकारच्या काळात घेण्यात आले.