गांधीजी आफ्रिकेतून सावरकरांशी मोदीजींच्याच फोनवरुन बोलले असतील – काँग्रेस


मुंबई – महात्मा गांधींच्या सांगण्यावरून वीर सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. आता यावरुनच काँग्रेसने सिंह यांच्यासहीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने महात्मा गांधींबद्दल चुकीची माहिती न पसरवण्याचे आवाहन करतानाच महात्मा गांधी आणि सावरकरांचे बोलणे मोदींच्या फोनवरुनच झाले असावे, असा टोलाही लगावला आहे.

राजनाथ सिंह यांनी ‘वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन’ या उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती, पण स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान काही विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केले आणि ते आता सहन केले जाणार नसल्याचे मत व्यक्त केले.

आतापर्यंत सावरकरांच्या विरोधात खूप खोटे बोलले गेले आहे. ब्रिटिश सरकारपुढे त्यांनी अनेक दया याचिका दाखल केल्या, हे वारंवार सांगितले गेले. त्यांच्या सुटकेसाठी या याचिका त्यांनी दाखल केल्या नाहीत. सामान्यत: कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. तुम्ही दया याचिका दाखल करा, असे महात्मा गांधी म्हणाले होते. त्यांनी गांधींच्या सूचनेवरूनच दया याचिका दाखल केली आणि सावरकरांना सोडण्याचे आवाहन महात्मा गांधींनी केले होते. ज्या प्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत, सावरकर तेच करतील असे गांधीजी म्हणाले होते, असे राजनाथ सिंह म्हणाले.

आता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यावरुन सिंह यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत उपरोधक पद्धतीने टीका केली आहे. असे वाटत आहे की सर्व भाजपवाल्यांचे डोके फिरले आहे. महात्मा गांधींची विचारसणी सत्य आणि अहिंसेवर आधारित होती. सत्य म्हणजेच राम, सत्य म्हणजेच जीवन आणि सत्य म्हणजेच धर्म अशी त्यांची विचारसणी होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याऐवजी त्यांना शरण जाणेच योग्य असल्याचे म्हटले आहे. राजनाथ सिंहजी, महात्मा गांधींना साम्राज्यकर्ते, जगावर राज्य करणारे आणि ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नाही, असे इंग्रज जिंकू शकले नाहीत. तुम्ही कशाला त्यांना जिंकण्याचा प्रयत्न करता? खोटे ठरवण्याचा प्रयत्न करता किंवा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न का करता?, असा प्रश्नही लोंढे यांनी उपस्थित केला आहे.

एवढ्या हास्यास्पद गोष्टी तुम्ही करता की असे वाटायला लागते की जगामध्ये जेव्हा डिजिटल कॅमेरा नव्हता, तेव्हा मोदींनी डिजिटल कॅमेऱ्याने फोटो काढला होता, जगामध्ये ईमेल नव्हता, तेव्हा त्यांनी ईमेल वापरला होता. त्याचप्रमाणे कदाचित गांधीजी आफ्रिकेतून सावरकरांशी मोदींजींच्याच फोनवरुन बोलले असतील, की तुम्ही माफी मागा, असा टोला लोंढे यांनी लगावला आहे.

महात्मा गांधी ९ जानेवारी १९१५ रोजी भारतामध्ये आले हे सत्य आहे आणि सावरकरांनी पहिली माफी १९११ साली मागितली होती. त्यामुळे थोडा इतिहास वाचा. जे तुमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चुकीचे तत्वज्ञान आहे, त्यामागे गेल्यामुळे आपली काय अवस्था होऊ शकते, याची जाणीव करुन घ्या, असा सल्लाही लोंढे यांनी दिला आहे.