भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शांत झोप लागते; कारण चौकशी वगैरे काही नाही – हर्षवर्धन पाटील


मुंबई – केंद्रीय तपास यंत्रणांनी राज्यात विधानसभा निवडणुकांच्याही पूर्वीपासून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील काही नेत्यांचा तपास सुरू केला आहे. शरद पवार यांना देखील निवडणुकांच्या आधीच नोटीस बजावून ईडीने चौकशी केली होती. तेव्हापासून अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब अशा अनेक नेत्यांची चौकशी सध्या ईडी, आयकर विभाग किंवा सीबीआय करत आहे.

या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपकडून राजकारणासाठी वापर होत असल्याची तक्रार केली जात असताना भाजपकडून मात्र हा आरोप सातत्याने फेटाळून लावला जात आहे. आता कधीकाळी काँग्रेसचे एक प्रमुख नेते असलेले हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी नुकतेच केलेले एक वक्तव्य चर्चेत आले आहे. या वक्तव्यामुळे विरोधकांना आयते कोलीतच मिळाल्याचे म्हटले जात आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये झालेल्या मेगाभरतीदरम्यान काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेते म्हणूनच हर्षवर्धन पाटील हे एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर भाजपचे अनेक नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते. तेव्हा राजकीय नेत्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याविषयीच्या मुद्द्यावर हर्षवर्धन पाटील यांनी मिश्किलपणे टोला लगावला. पण, त्यांनी असे करताना केलेल्या एका वक्तव्यामुळे नवीच चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे.

आपण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काय बदल घडला, याविषयी मिश्किल टिप्पणी एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. येथे मला आमदार साहेब म्हणाले, मी आहे तिथे सुखी आहे, तम्ही दिल्या घरी सुखी राहा. मला विचारणा झाली की तुम्ही भाजपमध्ये का गेला? त्यावर मी त्यांना म्हटले ते तुमच्या नेत्यालाच विचारा की हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेले. पण मी सांगतो, येथे मस्त निवांत आहे. भाजपमध्ये आल्यामुळे शांत झोप लागते. चौकशी नाही, काही नाही. मस्त वाटत असल्याचे हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. हर्षवर्धन पाटील यांचे स्टेटमेंट वाचले. कधीकाळी ते काँग्रेसचे नेते होते. ते आज भाजपमध्ये आहेत. ते म्हणाले की भाजपमध्ये गेले की शांत झोप लागते. चौकशीचा ससेमिरा मागे लागत नाही. या त्यांच्या एका वाक्यात सगळे सामावलेले असल्याचे राऊत म्हणाले.