आर्यन खानच्या जामीन अर्जावर उद्या सकाळी पुन्हा होणार सुनावणी


मुंबई – क्रूझ ड्रग्स प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज पुन्हा एकदा विशेष एनडीपीएस न्यायालयात सुनावणी झाली. दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणाचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे नसल्याच्या कारणाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर हे प्रकरण विशेष न्यायालयात आले आहे.

आर्यन खानला क्रूझ ड्रग्स प्रकरणात जामीन मिळाला नाही, तर शाहरुख खानने वकील सतीश मानशिंदे यांना बाजूला करत नवीन वकील अमित देसाई यांची नियुक्ती केली आहे. जामीन अर्जाची नोटीस दिल्यानंतर, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, ड्रग्जच्या प्रकरणात अनेक जामीन याचिका प्रलंबित असल्यामुळे एजन्सीला उत्तर दाखल करण्यासाठी किमान एक आठवड्याचा अवधी हवा आहे.

दरम्यान, आजची रात्रही ड्रग्स प्रकरणातील आरोपी आर्यन खानला तुरुंगात काढावी लागणार आहे. त्याच्या जामीन अर्जावर बुधवारी जवळपास तीन तास सुनावणी चालली आणि कोणताही निर्णय आला नाही. आता यावर गुरुवारी सुनावणी घेण्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हे प्रकरण आता गुरुवारी सकाळी ११ नंतरच सुनावणीसाठी येईल. अशा स्थितीत आर्यन खानची तुरुंगातून बाहेर येण्याची वाट पाहावी लागणार आहे.

एनसीबीने आर्यन खानवर आरोप केला आहे की तो परदेशातील काही लोकांच्या संपर्कात होता, जे बेकायदेशीर खरेदीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कचा भाग असल्याचे दिसते आणि तपास चालू आहे. जामीन मिळाल्यास तो देश सोडून जाऊ शकतो, या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नसल्याचेही एनसीबीने म्हटले आहे.

आतापर्यंतच्या तपासात, असे समोर आले आहे की आरोपी क्रमांक १ ला आरोपी क्रमांक १७ ने ड्रग्ज पुरवले होते. त्यामध्ये २.६ ग्रॅम गांजासह अटक करण्यात आली आहे. याशिवाय आरोपी क्रमांक -१९ (शिवराज हरिजन), जो आरोपी क्रमांक -२ ला ड्रग्ज पुरवतो, त्याला ६२ ग्रॅम चरससह अटक करण्यात आली आहे.