या सात कंपन्यात सेनेसाठी बनणार पिस्तुल ते फायटर विमाने

भारतीय सेनेला अधिक मजबुती देण्यासाठी देशातील सात रक्षा कंपन्या त्यांची उत्पादने १५ ऑक्टोबर म्हणजे दसऱ्यापासून सुरु करत आहेत. या कारखान्यात सैनिकांसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू अगदी पिस्तुले ते फायटर विमाने इथपर्यंत सर्व उत्पादन केले जाणार आहे. भारतीय आयुध निर्माण बोर्ड, ओएफबी ने या नव्या सात कंपन्यांची सुरवात केली आहे. सेनेची तिन्ही दले आणि  निमलष्करी दलांकडून या कारखान्यांना ६५ हजार कोटींच्या ऑर्डर दिल्या गेल्या असल्याचे समजते.

या कारखान्यात दारूगोळा, स्फोटके, वाहने, हत्यारे, उपकरणे, सैन्य सुविधा उपकरणे तयार केली जाणार आहेत. ऑप्टो इलेक्ट्रोनिक्स गिअर, पॅराशूट अशी अनेक उत्पादने यात सामील आहेत. अॅडव्हांस वेपन्स अँड इक्विपमेंट इंडिया लिमि, ट्रूप कम्फर्टस लिमिटेड, इंडिया ओप्टेल लिमिटेड, म्युनिशन इंडिया लिमिटेड, अवनी आर्म्ड व्हिकल, ग्लायडर्स इंडिया लिमिटेड, यंत्र इंडिया लिमिटेड अशी या कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्यांनी व्यावसायिक पातळीवर उत्पादन करून स्थानिक बाजारात त्यांचा हिस्सा वाढवावा आणि निर्यात संधीचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा केली जात आहे.

यापैकी ट्रूप कम्फर्टस लिमिटेड सैनिकांना आवश्यक सामग्रीचे उत्पादन करणार असून त्यात कपडे, बूट अशाही वस्तूंचा समावेश आहे. आत्तापर्यंत या प्रकारच्या वस्तू आयात केल्या जात होत्या आता त्या देशातच तयार होतील असे सांगितले जात आहे.