महाजालात म्हणजे इंटरनेटवर एक मिनिटात होतात इतक्या घडामोडी

इंटरनेट आले आणि साऱ्या जगाचे जणू हृदयस्पंदन बनून गेले असे म्हटले तरी ते फारसे चुकीचे ठरणार नाही. आज इंटरनेट हा जीवनावश्यक घटक असून काही काळासाठी ते बंद पडले तर जगात कोट्यावधी लोकांचे चित्त विचलित होते. कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते ते वेगळे. या महाजालात एका मिनिटाच्या काळात किती प्रकारच्या देवघेवी किंवा हालचाली होतात याची माहिती मोठी मनोरंजक आहे.

सांगितले तर खोटे वाटेल पण इंटरनेटच्या माध्यमातून एका मिनिटाला ६० लाख युजर ऑनलाईन शॉपिंग करत असतात. एका मिनिटात ६,६८००० मेसेज डिलीट होत असतात. एका मिनिटात गुगलवर ५७ लाख सर्च केले जात असतात, फेसबुकवर २.४ लाख फोटो शेअर होतात, इन्स्टाग्रामवर ६५ हजार फोटो शेअर होतात तर युट्युबवर युजर या एक मिनिटात ६.९४ लाख तासांचे व्हिडीओ स्ट्रीमिंग करतात.

याच एका मिनिटात ट्विटरवर ५.५७ लाख ट्विट होतात. टिकटॉकवर १६.७ कोटी व्ह्युज होतात. फेसबुक लाइव वर ४.४ कोटी व्ह्युज येतात तर नेटफ्लिक्सवर ४.५२ लाख तास व्हिडीओ स्ट्रीमिंग केले जाते. झूमवर याच एका मिनिटात ८५६ वेबिनार होत असतात, स्नॅपचॅटवर २० लाख मेसेज येत असतात, आय मेसेजवर १.२० कोटी युजर मेसेज करतात.

या एका मिनिटात अमेझॉनवर २,८३,००० डॉलर्स किमतीच्या वस्तू खरेदी होतात. इन्स्टाकार्टवर ६७००० डॉलर्सची खरेदी होते तर स्ट्रावा फिटनेस अॅपवर १५ हजार अॅक्टीव्हीटी शेअर केल्या जातात. टीम्सवर याच काळात १ लाख युजर्स कनेक्ट असतात तर क्लब हाऊसवर २०९ रूम क्रिएट होतात. आता बोला!