कोण आहेत आर्यन खानची केस लढविणारे अमित देसाई

शाहरुख खान पुत्र आर्यन खान याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार असून त्याची बाजू सतीश मानशिंदे यांच्या ऐवजी ज्येष्ठ अॅडव्होकेट अमित देसाई मांडणार आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजे एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी मुंबई गोवा क्रुझ वर घातलेल्या छाप्यात आर्यन खान सह अन्य आठ जणांना अटक केली असून आर्यनचा जामीन अर्ज चार वेळा फेटाळला गेला आहे. त्यामुळे सध्या तो आर्थर रोड जेल मध्ये बंद आहे. सचिन मानशिंदे आर्यनला जामीन मिळवून देण्यात यशस्वी ठरले नसल्याने शाहरुखने अमित देसाई यांच्याकडे हे काम सोपविले आहे.

सोमवारी देसाई यांनी एनसीबीने जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी मागितलेली एक आठवड्याची मुदत गैरलागू असल्याचे सांगताना प्रशासकीय कारणामुळे कुणाच्याही स्वातंत्र्यवर गदा आणणे योग्य नसल्याचे प्रतिपादन केले होते. ते म्हणाले होते आर्यनवर जो आरोप ठेवला गेला आहे त्यात एक वर्षापेक्षा अधिक शिक्षा होऊ शकत नाही.

अमित देसाई यांच्या घरातच वकिली असून त्यांनी १९८२ मध्ये बार जॉईन केला आहे. सुरवातीला त्यांना गुन्हेगारी वकील व्हायचे नव्हते पण बोफोर्स प्रकरणात त्यांच्या क्रिमिनल केसेस मधील रस वाढला आणि आज ते नामवंत क्रिमिनल लॉयर मानले जातात. बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या २००२ च्या हिट अँड रन केसमधून सलमानची २०१५ मध्ये निर्दोष सुटका झाली. त्याला त्यावेळी जामीन मिळवून देण्यात अमित देसाई यांचा वाटा मोठा होता असे सांगतात. विजय माल्या केस मध्येही ते काम करत आहेत असे समजते.