प्रवाशांनी केलेली घाण साफ करण्यासाठी रेल्वे प्रशासन वर्षाकाठी खर्च करते ऐवढे पैसे


नवी दिल्ली – आपल्या देशामध्ये सार्वजनिक ठिकाणी घाण करणे हा आरोग्यविषयक चिंता वाढवणारा विषय मागील बऱ्याच काळापासून आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारतीयांची कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराच्या कालावधीमध्येही रस्त्यावर थुंकण्याची सवय काही मोडलेली दिसत नाही. आता रेल्वेने यावरच एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे. स्पिटॉनला प्राधान्य देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. एखाद्या कापसाच्या गोळ्याप्रमाणे असणारे हे गोळे थुंकण्यासाठी वापरले जातात. या गोळ्यांमध्ये एक झाडची बी असते. त्यामुळे वापरुन झाल्यानंतर हा गोळा फेकून दिला तरी त्याचा पर्यावरणाला फायदाच होणार आहे. थुंकणारे प्रवासी हा भारतीय रेल्वेसमोर मोठा चिंतेचा विषय आहे.

भारतीय रेल्वेचे काम मध्य, पूर्ण आणि उत्तर अशा तीन मुख्य विभागांमध्ये चालते. रेल्वे प्रवासादरम्यान थुंकणाऱ्या प्रवाशांची या तिन्ही विभागांमध्ये मोठी समस्या आहे. त्यामुळेच आता रेल्वेने ४२ स्थानकांवर स्पिटॉन पाऊच विक्रीसाठी व्हेंडींग मशीन्स लावण्याची परवाणगी दिली आहे. पाच ते १० रुपयांना हे स्पिटॉन उपलब्ध होणार आहेत. इजिस्पीट नावाच्या स्टार्टअपला यासाठी रेल्वेने कंत्राट दिले आहे. या कापसासारख्या बोळ्यांचा वापर करुन रेल्वेच्या आवारात थुंकण्याऐवजी यावर थुंकून ते फेकून दिल्यास रेल्वेचा परिसर स्वच्छ राहील, असे सांगितलं जात आहे. हे स्पिटॉन बायोडिग्रेडेबल म्हणजेच विघटन होऊ शकणारे आहेत.

खास पद्धतीने स्पिटॉन हे तयार करण्यात आले असून यासाठी मायक्रोमॉलिक्युलर पल्प टेक्नोलॉजी वापरण्यात आली असून या माध्यमातून थुंकीमध्ये असणारे विषाणू या स्पिटॉनमध्ये अडकून राहतात आणि या स्पिटॉनच्या माध्यमातून संसर्ग टाळला जातो.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार दरवर्षी भारतीय रेल्वे प्रवाशांच्या थुंकण्याच्या सवयीमुळे पडलेले डाग आणि साफसफाई करण्यासाठी लाखो लीटर पाणी वापरते. त्याचबरोबर हे थुंकल्याचे डाग काढण्यासाठी वर्षाकाठी रेल्वेला येणाऱ्या खर्चाचा आकडा पाहून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल, कारण हा आकडा काही हजार किंवा लाखांमध्ये नसून तब्बल १२०० कोटी रुपये एवढा मोठा आहे. खास करुन पान मसाला आणि तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या व्यक्तींनी रेल्वेचे डब्बे, रेल्वेच्या मालकीची जागा आणि संपत्तीवर थुंकून केलेली घाण साफ करण्यासाठी हा एवढा खर्च होत आहे.