नवी दिल्ली : देशावर ओढावलेले कोरोना महामारीचे संकट आता काहीशा प्रमाणात मंदावण्यास सुरुवात झाली आहे. देशात काल दिवसभरात 14 हजार 313 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 181 बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात काल दिवसभरात 18 हजार 132 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.
देशात काल दिवसभरात 14 हजार 313 कोरोनाबाधितांची नोंद, तर 181 बाधितांचा मृत्यू
आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात 26 हजार 579 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे देशातील एकूण सक्रिय रुग्णसंख्येत घट झाली असून सध्या 2 लाख 14 हजार 900 बाधितांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत देशात तीन कोटी 33 लाख 20 हजार 57 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर आतापर्यंत देशात कोरोनामुळे चार लाख 50 हजार 963 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार काल दिवसभरात देशात कोरोना प्रतिबंधक लसीचे 65 लाख 86 हजार 92 डोस देण्यात आल्यानंतर लसीकरणाचा आकडा वाढून 95 कोटी 89 लाख 78 हजार 49 वर पोहोचला आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत घट पाहायला मिळत आहे. तर काल दिवसभरात राज्यात 1 हजार 736 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 033 बाधित कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत राज्यात 64 लाख 04 हजार 320 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.32 टक्के आहे. दरम्यान, राज्यात काल 36 बाधितांचा मृत्यू झाला. सध्या राज्याचा डेथ रेट 2.12 टक्के एवढा झाला आहे. तर राज्यात सध्या कोरोनाचे 32 हजार 115 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8,465 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.