ईडीने सील केलेल्या डी.एस.कुलकर्णी यांच्या बंगल्यातून सहा लाखांचा ऐवज लंपास


पुणे – पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी गेल्या ४ वर्षांपासून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईदरम्यान त्यांचा बंगलाही जप्त केला होता. आता याच बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

डीएसकेंचा चतुःश्रुंगी मंदिराजवळ ४० हजार चौरस फुट जागेत बंगला आहे. डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हा बंगला ईडीने जप्त करत सील केला होता. चोरट्यांनी या बंगल्याचे सील तोडून मोठा ऐवज लंपास केला आहे. याबद्दल भाग्यश्री कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे.

बंगल्याच्या दरवाज्याचे सील आणि लॉक तोडून चोरट्यांनी बंगल्यातील ८ एलईडी टीव्ही, कॉम्प्युटर्स, सीडी प्लेअर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरातील चांदीच्या वस्तू, कॅमेरा, गिझर असा एकूण ६ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.