पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा भाजप नेत्याकडून ‘दलित पोस्टर बॉय’ असा उल्लेख


नवी दिल्ली – पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना भाजप नेत्याने दलित पोस्टर बॉय म्हटले आहे. एका दलित युवकाची जमावाने राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात हत्या केली, भाजप नेत्याने त्या प्रकरणावरून चन्नी यांचे नाव घेत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्ष केवळ मतांचे राजकारण करत असून त्यांना लोकांचा विकास करायचा नसल्याची टीकाही त्यांनी केली. काँग्रेससह समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्यावरही भारतीय जनता पार्टी एससी मोर्चाचे अध्यक्ष लालसिंग आर्य यांनी शाब्दिक हल्ला केला आहे.

राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात दलितांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी पक्षाचे ‘दलित पोस्टर बॉय’ आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी राजस्थानला का गेले नाहीत? असा प्रश्न लालसिंग आर्य यांनी विचारला. आर्य म्हणाले, एससी समाजातील महिलांवर बलात्कार होतो आणि राजस्थानमध्ये मुले सुरक्षित नाहीत. परंतु, काँग्रेससाठी चन्नीसारखे मुख्यमंत्री दलित पोस्टर बॉय असूनही तेथे जात नाहीत. या पीडित कुटुंबाला भेटायला काँग्रेसचे नेतृत्व देखील गेले नाही. तसेच उत्तर प्रदेशप्रमाणे येथेही त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना कोट्यवधी रुपये देण्याची मागणी केली नसल्याचा टोला त्यांनी लगावला.

अखिलेश यादव आणि ‘अवॉर्ड वापसी टोळी’साठी देखील हेच लागू आहे. आमचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की, हिंसाचाराला जो कोणी जबाबदार असेल त्याला शिक्षा दिली जाईल. पण काँग्रेसला राजकारण करायचे आहे. काँग्रेस पक्ष मतांचा व्यापारी आहे आणि त्यांना संविधानाशी काही घेणे-देणे नाही. तसेच काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह असून त्यांना केवळ सत्तेची आवड आहे. ते जनतेसाठी काहीच करत नसल्याची टीका आर्य यांनी केली.