१२०० कोटींच्या टेंडरवरुन मनसेचा शिवसेनेवर धक्कादायक आरोप


मुंबई – रस्त्याच्या कामांमधील कंत्राटांमध्ये ब्लॅक लिस्टेड कंत्राटदारांना संधी देण्यासाठी अटींमध्ये फेरफार केल्याचा आरोप राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेवर केला आहे. आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रशासन आणि महानगरपालिका काळ्या यादीत कंत्राटदारांसोबत करार असणाऱ्यांनाच कंत्राट देणार असल्याची अट घालून पैसे गोळा करण्याचे काम करत असल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. निवडणुकीसाठी शिवसेनेला पैसे गोळा करायचे असल्यामुळे हे असले उद्योग केले जात असल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला आहे.

दोन हजार कोटींची कामे आता पुन्हा देत आहेत. २०१६ ला काही ठेकेदार होते, त्यांना ब्लॅक लिस्ट केले होते, २०१६ नंतर एक नियोजित टेंडर प्रणाली सुरू झाली. आता अनेक ठेकेदाराना टेंडरमध्ये सहभागी होता येते. आता पालिका पुन्हा १२०० कोटींचे टेंडर काढत आहे. मास्टिक प्लॅण्टसोबत त्याचा एमओयु असेल, तर आता काम देणार असे पालिका म्हणत असल्याचे देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

मास्टिक प्लॅण्टसोबत करार असला तरच कंत्राट देणार अशी अट घालण्यात आली आहे. हे मास्टिक प्लॅण्ट जे कंत्राटदार काळ्या यादीत होते त्यांचेच आहेत. मग आता हे लोक टेंडर भरणार असे केले जात आहे. ब्लॅक लिस्ट ठेकेदारांना काम मिळावे म्हणून पालिका प्रशासन आणि शिवसेना षडयंत्र रचत आहेत. शिवसेनेला निवडणुकीसाठी पैसे गोळा करायचे आहेत म्हणून ब्लॅक लिस्ट ठेकेदार यांना आत घेण्यासाठी पालिकेने टेंडर प्रकियेत बदल केल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे.

तसेच शिवसेनेचा या संपूर्ण प्रकरणामध्ये रोल काय आहे हे जाहीर करावे. पालिकेतील वीरप्पन रस्त्याच्या कामात लुटमार करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. वीरप्पन गँग पालिकेत कोण हे सर्वांना माहित आहेत. या ब्लॅक लिस्ट ठेकेदारांवर सेनेचे कसले प्रेम आहे, हे आता जाहीर करा, अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे मनसेची ही विनंती आहे रस्ते विभागाने कारवाई करावी. नाहीतर नंतर या प्रकरणामध्ये आम्ही काही केले तर बोलू नका, असे म्हणत देशपांडे यांनी सूचक शब्दात मनसे स्टाइल आंदोलनाचा इशाराही दिला आहे.