महाराष्ट्र बंदवरुन होणाऱ्या टीकेला उत्तर जितेंद्र आव्हाडांचे उत्तर


मुंबई – महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी बंद पुकारण्यात आला होता. भाजप नेत्यांनी या बंदवरुन सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधत जोरदार टीका केली. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर शरद पवारांच्या जालियनवाला बाग टीकेला उत्तर देताना मावळच्या गोळीबाराची आठवण करुन दिली होती. दरम्यान बंदवरुन होणाऱ्या टीकेला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिले आहे.

याप्रकरणी भाजप काही करणार नाही. ते मिश्रांना मंत्रिमंडळातून काढणार नाहीत, कारण त्यांचे संस्कार आणि संस्कृती तशी आहे. बापाला लाज वाटली पाहिजे माझा मुलगा असा वागूच कसा शकतो. अंगावर शहारा आणणारे ते दृश्य होते. समोर माणूस दिसत असताना अंगावर गाडी घातली. एकाने तर खाली पडलेल्या व्यक्तीला रिव्हॉल्ववरने गोळी घातली, हे त्यात दाखवण्यात आले नसल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अमेरिकेच्या जॉर्ज फ्लाइडचे उदाहरणदेखील दिले. त्याच्याशी या घटनेची तुलना करता येईल, कारण यामध्ये सत्तेचा माज दिसतो, असे त्यांनी म्हटले आहे.

बंदसाठी बळजबरी झाली का? हा चौकशीचा विषय आहे, पण बंद झाला हे मात्र खरे आहे. फाशी द्या काहीही करा पण प्रश्न माणुसकीचा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. दुखवटयाचा एक शब्दही सत्ताधारी पक्षाकडून येत नाही याचा अर्थ आम्ही करु तो कायदा, आम्हाला सत्तेचा माज आला आहे, हे त्यांनी दाखवून दिले असल्याची टीका यावेळी त्यांनी केली.

लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्यात आली असून पोलिसांनी मावळमध्ये गोळीबार केला होता. पोलीस आणि सर्वसामान्य जनतेमध्ये काही फरक आहे की नाही? अजय मिश्रांना काय कुठेही घुसा आणि चिरडून टाका याचा परवाना दिला आहे का? चार दिवसांनी अटक करता…हा कसला सत्तेचा माज. कायदा, घटना या देशात काही आहे की नाही? गरीब मेले तर काही नाही, श्रीमंत मेले तरच वाईट वाटणार का?, असा सवाल यावेळी त्यांनी विचारला.

विरोधकांना काय म्हणायचे आहे ते म्हणू दे, त्यांनी मावळ काढावे नाहीतर अन्य काहीही काढावे. पण समोर दिसत असतानाही एखादया केंद्रीय नेत्याच्या मुलाने त्यांच्या अंगावर गाडी घालणे आणि परत दोन गाड्या त्या मृतदेहांवरुन जाणे याबद्दल भारतीय जनतेच्या मनात नक्की चीड आहे. भारतातील मानवी संस्कारात सुसंस्कृतपणा आहे. अहिंसेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महात्मा गांधींचा हा देश आहे. तेव्हा नथुरामच्या चिल्ल्या पिल्यांना काय वाटते याच्याशी आपले काही संबंध नसल्याचेही ते म्हणाले.

एखाद्या अमानवी कृत्याचे दुख: होणे हे माणुसकीचे दर्शन आहे. त्या घटनेतून सत्तेचा माज दिसत आहे. या घटनेबद्दल जर वाईट वाटणार नसेल, तर ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शेतकरी कुठलाही असला तरी या देशातील तो आहे. तुम्ही खात असलेल्या पोळ्या तिथूनच आल्या आहेत. यातून तुमच्या लेखी शेतकऱ्यांची किंमत काय हेच दिसून येते, अशी टीका आव्हाडांनी केली. ते विरोधक आहेत, तर ते म्हणणारच परंतु दोन शब्द बोलले असते, तर त्यांच्यातील माणुसकी दिसली असती, असे उत्तर यावेळी त्यांनी फडणवीसांच्या टीकेला दिले.