नवी दिल्ली : भाजपला उत्तराखंडचे वाहतूक मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते यशपाल आर्या यांनी सोडचिठ्ठी दिली आहे. आता अंतर्गत लोकशाही नावाचा प्रकारच भाजपमध्ये उरला नसल्याचे सांगत त्यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उत्तराखंडच्या विधानसभेच्या निवडणुका पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे राज्य आपल्या हाती कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला यशपाल आर्याच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे जोरदार धक्का बसल्याचे समजले जाते.
उत्तराखंडमधील भाजप सरकारचे मंत्री यशपाल आर्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा यशपाल आर्या यांनी राजीनामा दिला आणि राहुल गांधीची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहिती काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. यशपाल आर्या यांच्यासोबत त्यांच्या मुलानेही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. केवळ काही लोकांच्या हातात भाजपमध्ये अधिकार असून अंतर्गत लोकशाही राहिली नसल्याची टीका त्यांनी केली. अंतर्गत लोकशाहीला काँग्रेसमध्ये मोठे महत्व असल्यामुळे आपण या पक्षात प्रवेश करत असल्याचे ते म्हणाले.
सात वर्षापूर्वी यशपाल आर्या हे उत्तराखंड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यशपाल आर्या हे उत्तराखंडमधील प्रमुख दलित नेते असून सहा वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. काँग्रेस प्रवेशामुळे त्यांची घर वापसी झाल्याची चर्चा असून प्रदेश काँग्रेसमध्ये नवीन उत्साह संचारल्याचे चित्र आहे. येत्या काही काळात राज्यातील अनेक भाजपचे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांनी सांगितले.