या मंदिरात होते दुर्गेच्या दहाव्या रुपाची पूजा

देशात सध्या नवरात्र सुरु असून या काळात दुर्गामाता नऊ विविध स्वरुपात पुजली जाते. झारखंडच्या कोडरमा जिल्यात मात्र एक असे दुर्गा मंदिर आहे जेथे दुर्गा दहाव्या रुपात पुजली जाते. येथे दुर्गेची पूजा कुमारी स्वरूप होते. यामुळे येथे सिंदूर पूजा केली जात नाही. सिंदूर पूजा सवाष्ण महिलेची होते. येथे दुर्गा कुमारी स्वरुपात असल्याने तिची सिंदूर पूजा होत नाही असे समजते.

झारखंडच्या चंचल पहाडी वर हे मंदिर असून येथे जाण्याचा मार्ग अतिशय खडतर आणि दाट जंगलातून जातो. तरीही येथे भाविकांची मोठी गर्दी होते कारण येथे अनेकांना दुर्गेच्या साक्षात दर्शनाची अनुभूती येते असे म्हणतात. बिहडच्या जंगलात ४०० फुट उंचीवरच्या पहाडावर ही चंचलिनी माता विराजमान आहे. मंदिरात प्रवेश करताना ५ मीटर अंतर गुहेत गूढग्यांवर रांगून जावे लागते. २० व्या शतकात ९० च्या दशकात सुद्धा या जंगलात प्रवेश करण्यास भीती वाटत असे. पण चंचलिनी मातेवरील श्रद्धेतून भाविक येथे येत असत. ही माता नवसाला पावते असाही समज आहे.

असे सांगतात की १९५६ साली झरियाच्या राजमाता सोनामती देवी येथे दर्शनासाठी आल्या होत्या. झरिया राजा कालीप्रसाद आणि राणी सोनामती यांना अपत्य नव्हते तेव्हा त्यांनी या देवीला नवस केला होता आणि त्यानुसार त्यांना पुत्रप्राप्ती झाली तेव्हा राजमाता येथे नवस फेडायला आल्या होत्या. तेव्हा हा मार्ग किती खडतर आहे हे पाहून त्यांनी पहाड चढण्यासाठी दोन्ही बाजूला भक्कम लोखंडी शिड्या उभ्या केल्या आणि जंगलात रस्ता तयार केला.

गुहेत गेल्यावर भिंतीवर मातेच्या सात मूर्ती दिसतात. जे लोक वाईट विचाराने येथे येतात यांच्यावर भुंगे हल्ला चढवितात असे सांगितले जाते. असे सांगतात की १६४८ मध्ये देविपूर राजा तुलसिनारायण सिंग यांचे वडील जयनारायण पहाडावर शिकारीसाठी आले होते तेव्हा त्यांना सिंहावर आरूढ मा भगवतीचे दर्शन झाले होते तेव्हापासून येथे कन्या स्वरुपात मातेची पूजा केली जाते. पहाडाच्या टोकावर देवाधिदेव महादेव मंदिर असून तेथपर्यंत पोहोचणे अतिशय अवघड आहे.