एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यावर ठेवली जातेय पाळत

शाहरुख खान पुत्र आर्यन खान याला अमली पदार्थविरोधी पथक (एनसीबी) ने अटक केल्यानंतर या प्रकरणाचे तपास प्रमुख झोनल डायरेक्टर समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले आहेत. आता या प्रकरणाला नवे वळण लागले असून वानखेडे आणि एनसीबीच्या अन्य अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन एक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार वानखेडे यांनी गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांकडून त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचे आणि त्यांचा पाठलाग केला जात असल्याचे म्हटले आहे.

सध्या वेशातील अनेक लोक आपला पाठलाग करत असून माझ्या हालचालींवर नजर ठेऊन आहेत असा आरोप करताना समीर वानखेडे यांनी त्याचा पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेज सादर केले आहे. मुंबई पोलीस अन्य काही एनसीबी अधिकाऱ्यांना सुद्धा ट्रॅक करत आहेत असाही आरोप त्यांनी केला आहे.

आर्यन खान प्रकरणात या हाय प्रोफाईल क्रुझ ड्रग पार्टीविरुद्ध चार्जशीट दाखल करण्यासाठी एनसीबी ला ६ महिने मुदत आहे. याच काळात वानखेडे यांनाही सहा महिने मुदतवाढ दिली गेली असून त्यांना दिली गेलेली ही दुसरी मुदतवाढ आहे. गेल्या वर्षी सुशांतसिंग राजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरणात रिया आणि अन्य संशयिताना एनडीपीएसने अटक केली त्यावेळी सुद्धा एनसीबीने मुंबईत अनेक ड्रग पेडलर्स पकडले होते. मिळालेल्या टीप नुसार गोरेगाव येथे छापा टाकण्यासाठी गेलेल्या वानखेडे आणि त्यांच्या टीमवर त्यावेळी हल्ला केला गेला होता त्यात ते जखमी झाले होते. वानखेडे यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

एनसीबी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावेळी सुद्धा मुंबई पोलिसांशी संपर्क साधून वानखेडे यांची सुरक्षा वाढवावी असे सुचविले होते मात्र वानखेडे यांनीच त्याला नकार दिला होता. आर्यन खान क्रुझ पार्टीची खबर वानखेडे यांना दोन आठवडे आधीच मिळाली होती आणि त्याची खात्री करून घेतल्यावर त्यांनी २२ जणांच्या टीम सह प्रवासी बनून क्रुझवर प्रवेश मिळविला होता.