हिमाचल पोटनिवडणूक, खरे हिरो आणि फिल्मी हिरो आमनेसामने

हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत कारगील युद्धातील खरे हिरो ब्रिगेडियर कुशाल ठाकूर भाजपतर्फे निवडणूक रिंगणात उतरले आहेत तर कॉंग्रेसने स्टार प्रचारक म्हणून राज बब्बर यांच्यावर प्रचार जबाबदारी दिली आहे. विशेष म्हणजे एलओसी कारगील या चित्रपटात ब्रिगेडीअर कुशाल यांची भूमिका राज बब्बर यांनी केली होती. त्यामुळे येथे असली हिरो विरुद्ध रील हिरो अशी मजेदार परिस्थिती निर्माण झाली आहे.

कारगील युद्धात १८ ग्रेनेडीअरचे नेतृत्व करणारे ब्रिगेडीअर कुशाल यांनी टायगर हिल आणि तोलोलिंग मध्ये घुसखोरी केलेल्या पाक घुसखोरांना अक्षरशः या भागातून हुसकून लावले होते. त्यावेळी त्यांनी आणि त्यांच्या पथकाने असाधारण पराक्रम गाजविला होता. ब्रिगेडीअर कुशाल यांना युद्ध सेवा मेडलने सन्मानित केले गेले होतेच पण त्याच्या युनिटने ५२ वीरता पुरस्कार मिळवून विक्रम केला होता.

या युद्धावर आधारित २००३ मध्ये आलेल्या एलओसी कारगील चित्रपटात राज बब्बर यांनी ब्रिगेडीअर कुशाल यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात ३२ अभिनेते मुख्य भूमिकात होते त्यात संजय दत्त, अजय देवगन, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, मनोज वाजपेयी, अभिषेक बच्चन असे अनेक कलाकार होते. या चित्रपटाचे शुटींग लेह मध्ये झाले होते आणि त्यात १ हजार सेना जवान सहभागी झाले होते असे समजते.