येतेय करोना प्रतिबंधक गोळी

औषध निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी मर्क ने अमेरिकन फूड अँड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशन म्हणजे एफडीए कडे कोविड १९ प्रतिबंधक औषधाला मंजुरी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार या औषधाला मंजुरी मिळाली तर करोनापासून बचाव करणारे हे पहिले औषध असेल. या संदर्भातला निर्णय एफडीआय लवकरच देणार असल्याचे समजते. आत्तापर्यंत एफडीआयने करोना संक्रमण विरोधातील ज्या ज्या उपचारांना परवानगी दिली आहे त्यात इंजेक्शन घेणे हाच उपाय आहे. पण हे नवे औषध गोळी म्हणजे टॅब्लेट स्वरुपात असून करोना संक्रमण होते आहे असे वाटले तर घराच्याघरीच ही गोळी घेता येणार आहे.

या नव्या औषधामुळे अमेरिकेतील रुग्णालयांवर येत असलेला ताण कमी होईल असा दावा केला जात आहे. त्याचबरोबर जेथे आरोग्य सेवा अगदी कमकुवत आहेत अश्या गरीब देशांना सुद्धा करोना विरोधी युद्धात ही गोळी महत्वाची कामगिरी बजावू शकेल असे सांगितले जात आहे. अमेरिकन एफडीए कडून या औषधाची सुरक्षितता आणि प्रभाव यांची आकडेवारी तपासली जात आहे.

या संदर्भात मर्क आणि रिजेबॅक बायोथेरेपिक तर्फे एक पत्रक जारी केले गेले आहे. त्यानुसार कोविडच्या प्राथमिक ते मध्यम प्रकारच्या लक्षणात ही गोळी वयस्क नागरिकांवर वापरण्यास आपत्कालीन मंजुरी एफडीए कडे मागितली गेली आहे. या लोकांत कोविड संक्रमण झाल्यास हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची जोखीम जास्त आहे. सध्या तरी कोविड पासून बचावासाठी लसीकरण हाच एक पर्याय आहे.