राज्यात एका दिवसात साडेआठ लाखांवर लाभार्थ्यांना लस – अपर मुख्य सचिवांची माहिती


मुंबई : राज्यात शनिवारी सुमारे साडेआठ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना कोविड-19 लस देण्यात आली, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ‘मिशन कवच कुंडले अभियान’ राबविण्यात येत आहे. 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

पुणे जिल्हा आघाडीवर
अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले की, शनिवारी 6 हजार 47 लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये 8 लाख 63 हजार 635 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत 8 कोटी 72 लाख 93 हजार 844 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. शनिवारी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 99 हजार 71 लस देण्यात आली. त्यापाठोपाठ ठाणे ( 90139) आणि मुंबईमध्ये (88991) लस देण्यात आली.

महापालिका आयुक्तांना सूचना
शहरात लसीकरणाबाबत काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना अपर मुख्य सचिव व्यास यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील महानगरपालिका आयुक्तांकडून नियोजन केले जात आहे. शहरात लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी डॉ. व्यास विशेष आढावा घेत आहेत.

‘मिशन कोरोना विजय’च्या माध्यमातून जनजागृती
लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. पुणे, नंदूरबार, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी ‘मिशन कोरोना विजय’ अभियानाची सुरुवात सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सुरू केली आहे. अमेरिकन इंडियन फाऊंडेशन आणि आरोग्य विभागाच्या वतीने हे अभियान राबविण्यात येत आहे.