ट्विटरवर दोन वरिष्ठ पत्रकारांमध्ये शाहरुखला ‘मुस्लिम सुपरस्टार’ म्हटल्यामुळे खडाजंगी


मुंबई – सध्या सोशल मीडियावर कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानवरुन चांगलीच चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांमध्ये आर्यन खानवरील कारवाईवरुन मतांतर सुरु असून यावरुन अनेक वाद-प्रतिवाद होत असल्याचे दिसत आहेत. दोन गटात लोक विभागले असून काही जणांनी तर या कारवाईचा संबंध थेट धर्माशी जोडला आहे. शाहरुख खान मुस्लिम असल्यामुळे त्याला त्रास दिला जात असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.

दरम्यान दोन वरिष्ठ पत्रकार आरफा शानम शेरवानी आणि अनंत विजय यांची यावरुन ट्विटरवर जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. आरफा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले होते की, आर्यन खान प्रकरणात त्याचा ड्रग्जचे सेवन करण्याशी काही देणे-घेणे नाही, पण शाहरुखवर निशाणा साधला जात आहे. आर्यन खानला या देशात जामीनाच्या मुलभूत अधिकारापासून दूर ठेवले जात आहे. आजच्या काळातील शाहरुख सर्वात मोठा मुस्लिम सुपरस्टार आहे यामध्ये दुमत नाही, पण सध्या सुरु असलेली ‘शिक्षेची प्रक्रिया’ त्याला रांगेत उभे राहण्याचा संदेश आहे.

अनंत विजय यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत यावर म्हटले की, मुस्लिम सुपरस्टार? या देशात तुमच्यासारखे लोकच हिंदू-मुस्लीम विभाजन करतात. आरफा खानम शेरवानी यांनी याला उत्तर देताना म्हटले की, बरोबर बोललात तुम्ही..माझ्याच धोरणांमुळे देश हिंदू-मुस्लीम यात विभागला गेला आहे. देशातील लोकशाही संस्था मीच कमकुवत करत असून धर्मनिरपेक्ष राज्यघटना बदलून ‘हिंदू राष्ट्र’ करु इच्छित आहे.

यानंतर आरफा खानम शेरवानी यांची विचारसरणी जिन्नासारखी असल्याचा अनंज विजय यांनी उल्लेख करत म्हटले की, एका अशा अभिनेत्याला तुम्ही मुस्लीम केले आहे, ज्याच्यावर संपूर्ण देश प्रेम करतो. तुमची हीच विचारसरणी जिन्नासारखी आहे. आता शाहरुखवर चर्चा होत आहे, तर त्याचवरच राहा. राज्यघटना, लोकशाही, हिंदू राष्ट्र या सर्वांवर बोलू शकतो, पण आता भरकटवू नका.