केंद्रीय राज्यमंत्री म्हणतात; पेट्रोल-डिझेलचे भाव कोरोना लस मोफत दिल्यामुळे वाढले


नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत देशात सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी गाठलेली असताना आता अनेक राज्यांमध्ये डिझेल देखील शंभर रुपये प्रतिलीटर दरावर पोहोचले आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला इंधन दरवाढीमुळे कात्री बसत असताना केंद्रातील मंत्री मुक्ताफळे उधळत आहेत. देशवासियांना मोफत कोरोना लस केंद्राने दिल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याचे वक्तव्य पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी केले आहे. हिमालयातील एक लिटर पाणी एक लिटर पेट्रोलपेक्षा महाग असल्याचेही तेली म्हणाले.

पेट्रोल महाग नाही, पेट्रोलवर केंद्र आणि राज्यांनी कर लावला आहे. तुम्हाला कोरोना प्रतिबंधात्मक लस मोफत मिळाली आहे. त्या लसींसाठी पैसे कुठून येणार? तुम्ही लसींसाठी पैसे दिले नसल्यामुळे लसींची किंमत या करांमधून वसूल करण्यात आल्याचे तेली गुवाहाटीमध्ये म्हणाले. आसाममधील डिब्रूगढचे रामेश्वर तेली लोकसभा खासदार आहेत. पेट्रोल आणि डिझेलवरील करातून जमा झालेला पैसा कोरोना लस खरेदी करण्यासाठी वापरला जातो, असे तेली म्हणाले.

देशातील १३० कोटी लोकांचे मोफत लसीकरण करण्याचे लक्ष्य आमच्या सरकारने ठेवले आहे. प्रत्येक लसीची किंमत १२०० रुपये आहे आणि प्रत्येक व्यक्तीला लसीचे दोन डोस दिले जाईल. तर, दुसरीकडे एक लिटर पेट्रोलची किंमत ४० रुपये आहे. केंद्र आणि राज्यांनी पेट्रोलवर कर लावला आहे. इंधनावर सर्वात कमी मूल्यवर्धित कर लावणारे आसाम हे देशातील एकमेव राज्य असल्याचे ते म्हणाले.

यावेळी तेली ब्रँडेड पॅकेज्ड वॉटर आणि पेट्रोलची तुलना करताना म्हणाले, तुम्हाला जर हिमालयीन पाणी प्यायचे असेल, तर तुम्हाला एका बाटलीसाठी १०० रुपये मोजावे लागतील. तसेच जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढतील, तेव्हा पेट्रोल, डिझेलचे दर आपोआप वाढतील. आमचे मंत्रालय इंधनाचे दर ठरवत नाही. वाणिज्य विभागाने ते दर निश्चित केले आहे आणि ते आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडले गेले आहे.