डेहरादून – मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज फेटाळला. महानगरदंडाधिकारी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी घेऊन निर्णय देऊ शकत नसल्याचे न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळताना नमूद केले. पुन्हा एकदा बॉलिवूड आणि ड्रग्जचा वापर यासंबंधी आर्यन खानच्या अटकेमुळे चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय देशात अनेक ठिकाणी ड्रग्ज सापडत असून यासंबंधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली आहे. उत्तराखंडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
ड्रग्ज प्रकरणांवर सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
यावेळी भारतीय कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व समजावून सांगताना पाश्चिमात्य देशही भारतीय कुटुंब व्यवस्थेचा अभ्यास करत होते, असे मोहन भागवत यांनी सांगितले. तसेच ही मूल्य नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप केला. पाश्चिमात्य देशांनी लोकांना आपले गुलाम बनवण्यासाठी चीनमध्ये ओपियम पाठवले. त्याच्या आहारी तरुण गेले आणि चीनवर पाश्चिमात्य देशांनी राज्य केले. हेच आपल्या देशातही सुरु आहे. जेव्हा तुम्ही ड्रग्ज प्रकरणे पाहता आणि ते कुठून येतात हे पाहिले तर ते का, कशासाठी येत आहेत आणि याचा फायदा कोणाला होत आहे हे तुम्हाला समजेल, असे मोहन भागवत म्हणाले आहेत.
लग्नासाठी धर्मांतर करणाऱ्या हिंदूबाबत मोहन भागवत म्हणतात…
लग्नासाठी इतर धर्मांमध्ये धर्मांतर करणारे हिंदू मोठी चूक करत असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. हे सर्व एका छोट्या स्वार्थासाठी घडत होत असल्याचे सांगताना मोहन भागवत यांनी हिंदू कुटुंब आपल्या मुलांना धर्माचा अभिमान बाळगण्यासंबंधी, परंपरा आणि मूल्यांचं शिक्षण देत नसल्याचेही म्हटले आहे.
कसे काय धर्मातर होते? इतर धर्मात आपल्या देशातील मुले, मुली कसे काय जातात? छोट्या छोट्या स्वार्थांसाठी, लग्न करण्यासाठी. हे करणारे चुकीचे आहेत हा मुद्दा वेगळा आहे. पण आपण आपली मुले तयार करत नसल्याचे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. उत्तराखंडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. आरएसएस कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांशी येथे त्यांनी संवाद साधला.
कथित ‘लव्ह जिहाद’विरोधात भाजपशासित राज्यांमध्ये कायदा आणण्यात आला असतानाच मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केले आहे. हा कायदा आरएसएसकडून असलेल्या दबावामुळेच आणण्यात आल्याचे बोलले जात आहे.
मोहन भागवत यांनी यावेळी भारतीय कौटुंबिक मूल्य आणि त्यांचे जतन करण्याबद्दलही सांगितले. तसेच आरएसएसच्या अनेक कार्यक्रमांमध्ये फक्त पुरुषच दिसतात हा मुद्दाही उपस्थित केला. हिंदू समाज संघटित करणे हाच आरएसएसचा मुख्य हेतू आहे. पण जेव्हा आम्ही आरएसएसचे कार्यक्रम आयोजित करतो, तेव्हा आम्हाला फक्त पुरुषच दिसतात. जर संपूर्ण समाज संघटित करायचा असेल तर यामध्ये ५० टक्के महिला असल्या पाहिजेत, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
आपली मुले ओटीटी प्लॅटफॉर्मवर काय पाहतात यासंबंधी काळजी घेण्याचेही आवाहन मोहन भागवत यांनी यावेळी पालकांना केले. ते म्हणाले की, सर्व काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळते. माध्यमांमध्ये जे येते ते मुलांसाठी आणि आपल्या मूल्यांच्या व्यवस्थेसाठी काय चांगले होईल या दृष्टीकोनातून नसते. आपणच मुलांना घरात काय पहायला हवे आणि काय नको हे शिकवण्याची गरज आहे.