आर्यन खानच्या जामिनावरील सुनावणीसाठी न्यायालयाकडून पुढची तारीख


मुंबई – क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आजही (११ ऑक्टोबर) दिलासा मिळाला नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद मुंबई सत्र न्यायालयाने ऐकल्यानंतर त्याच्या जामिनावरील सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे. यानुसार आता पुढील सुनावणी बुधवारी (१३ ऑक्टोबर) होणार आहे. आर्यन खानचे वकील अमित देसाई यांनी सुनावणी दरम्यान गर्दी होत असून त्यात कोरोनाशी संबंधित शारीरिक अंतराचे पालन होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर केवळ ज्येष्ठ वकिलांनाच सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

विशेष म्हणजे आर्यन खानच्या जामिनावरील पुढील सुनावणी कधी घ्यावी यावरुन सरकारी वकील आणि अॅड. अमित देसाई यांच्यात खडाजंगी झाल्याचे दिसले. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी घेण्याची विनंती देसाई यांनी केली. पण, विशेष सरकारी वकील सेठना यांनी गुरुवारी सुनावणी घेण्याची विनंती केली. यावर न्यायालयाने बुधवारी सुनावणी ठेवली. यानंतरही सेठना यांनी गुरुवारचा आग्रह केल्यानंतर देसाई यांनी त्यांना न्यायालयाचा थोडा आदर ठेवा, असे म्हणत टोला लगावला.