महाविकास आघाडीला पालघर हत्याकांड, मुंबईतील निर्भयासारख्या घटनांनंतर बंदची आठवण झाली नाही? – राम कदम


मुंबई – राज्यातील सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज, सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. पण या बंदला भाजपने विरोध केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्यामुळे सारे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे. या बंदला आधी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. पण, नंतर नरमाईची भूमिका घेत बंदला पाठिंबा असल्याचे व्यापाऱ्यांनी जाहीर केले. पण आता या बंदवरुन सत्ताधाऱ्यांवर भाजप आमदार राम कदम यांनी निशाणा साधला आहे. पालघर हत्याकांड, महाराष्ट्रात निर्भया केस यावेळी महाराष्ट्रात बंदची आठवण झाली नाही का? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

देशात स्वातंत्र्य प्राप्तीनंतर असे कधीही घडले नसेल की एखाद्या राज्यात ज्या पक्षाचे सरकार आहे ते सरकारच लोकांना बंदसाठी आवाहन करत आहे. कोरोना काळात सर्वकाही दीड वर्षे बंद होते. आता कुठेतरी सर्वकाही उघडले आहे. लोक अडचणीत आहेत, संघर्ष करत आहेत. पण राजकीय स्वार्थापोटी या तीन पक्षांनी लोकांच्या माथ्यावर हा बंद लादला आहे. गोरगरीबांचे नुकसान होणार आहे ते कोण भरुन देणार आहे? तुम्ही तीन पक्ष हे नुकसान भरुन देणार आहात का? ज्यांना बंदमध्ये सहभागी व्हायचे नाही त्यांचे काय? अशा लोकांवर तीन पक्षाचे लोक बंद करणार असतील, जोर जबरदस्ती करणार असतील, तर आम्ही रस्त्यावर उतरु, असे राम कदम म्हणाले आहेत.

पालघर हत्याकांड घडले, पाच दिवसात काश्मीरमध्ये सात हिंदूंना ठार मारण्यात आले, मुंबई आणि महाराष्ट्रात निर्भयासारख्या घटना सातत्याने घडत आहेत, तेव्हा तुम्हाला बंदची आठवण नाही आली?, असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केला आहे. आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करतो. शेतकऱ्यांमुळे पोटाला भाकरी मिळते. पण शेतकऱ्यांच्या आडून महाराष्ट्रातील या तिन्ही पक्षांनी तसेच देशातील विरोधी पक्षाने राजकारण करण्याचे दु:साहस करु नये, असा इशारा राम कदम यांनी दिला आहे.