गोपीचंद पडळकरांची महाराष्ट्र बंदवरून संजय राऊतांवर टीका


मुंबई – भाजप नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. पण या बंदला विरोध भाजपने केला असून सामान्य जनजीवन विस्कळीत होत असेल, तर रस्त्यावर उतरुन विरोध करु असे म्हटले होते.

दरम्यान, या बंदवरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर राज्य सरकारसह संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल संजय राऊत तुम्ही बोला. ओल्या दुष्काळामुळे तो आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला आहे, असे पडळकर यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचा साताबारा कोरा करू म्हणणारे अजूनपर्यंत त्याला मदत द्यायला बांधावरती पोहचले नाही. अजूनही शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या खाबूगिरीतच अडकवलेले आहे. तुमचा हा महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे आपल्या घरात आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरावर बोंबा मारण्यासारखे असल्याची टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

आम्हाला लखीमपुरच्या शेतकऱ्यांबद्दल संपूर्ण सहानूभूती आणि सहवेदना आहे. म्हणूनच याचा सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे आणि आमचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे क्षमतापूर्ण आहेत, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते नक्कीच कठोर निर्णयही घेतील. मुळात तुम्हाला काकाचे दु:ख सतावत आहे. कारण पंतप्रधान मोदीजी महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली प्रस्थापितांची किड साफ करत आहेत आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे खाणारे कारखाने कवडी मोल भावाने गिळणाऱ्यांवरती फास आवळत आहेत. याचे पित्त झाल्यामुळे हा महाराष्ट्र बंदचा देखावा असल्याची टीका पडळकर यांनी केली.