महाराष्ट्र बंदवरुन अमृता फडणवीसांचा महाविकास आघाडीवर निशाणा


मुंबई – भाजप नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने लखीमपूर खेरी येथे गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात राज्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. पण या बंदला विरोध भाजपने केला असून सामान्य जनजीवन विस्कळीत होत असेल, तर रस्त्यावर उतरुन विरोध करु असे म्हटले होते. या बंदवरुन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली आहे. आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. लखीमपूर घटनेबद्दल तेथील सरकार दोषींवर कारवाई करत असल्याचे त्यांनी म्हटले.

अत्यावश्यक सेवा महाराष्ट्र बंददरम्यान वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्यामुळे बंदला प्रतिसाद मिळत आहे. पण या बंदवर भाजपने चांगलीच टीका केली आहे. या बंदचा अनेक भाजप नेत्यांनी निषेध करत राज्य सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील महाराष्ट्र बंदवरुन महाविकास आघाडी सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

महाराष्ट्र बंद संदर्भात अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी त्यातून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोणी मला माहिती देऊ शकेल का. आज वसूली चालू आहे की बंद?, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. या ट्विटसोबत अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र बंद नाही हा हॅशटॅगही जोडला आहे. दरम्यान नेहमीच ट्विटरच्या माध्यमातून अमृता फडणवीस या राज्य सरकार आणि त्यांच्या कामाबाबत भाष्य करत असतात. यावेळी महाराष्ट्र बंदवरून अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.