पान मसाल्याची जाहिरात अमिताभ बच्चन यांनी सोडली, परत केले कोट्यावधींचे मानधन


काही दिवसांपूर्वी आपल्या पान मसालाच्या जाहिरातीमुळे बिग बी अमिताभ बच्चन यांना टीकेचा सामना करावा लागला होता. बिग बींनी यावेळी टीका करणाऱ्यांना उत्तर देत स्पष्टीकरण देखील दिले होते. त्यानंतर आता बिग बींनी मोठा निर्णय घेतला आहे. पान मसाला कंपनीसोबत जाहिरातीसाठी त्यांनी केलेला करार मोडला आहे. तसेच त्यांनी या जाहिरातीसाठी मिळालेले मानधन देखील परत केले आहे.

बिग बींनी करार मोडत असताना यावेळी ही जाहिरात ‘सरोगेट जाहिरात’ श्रेणीत येत असल्याची त्यांना कल्पना नसल्याचे स्पष्टीकरण दिले. एका राष्ट्रीय तंबाखू विरोधी संघटनेकडून काही दिवसांपूर्वीच बिग बींना या जाहिरातीतून बाहेर पडण्याची मागणी केली होती. त्यानंतर बिग बींनी हे पाऊल उचलले आहे.

अमिताभ यांनी एका अधिकृत निवेदनातून ‘कमला पसंद’ ब्रॅडशी करार संपवल्याचे जाहीर केले. त्यांना या निवेदनात म्हटले आहे, कमला पसंद…जाहिरात प्रसारित झाल्यानंतर काही दिवसातच मिस्टर बच्चन यांनी ब्रॅण्डशी संपर्क साधला आणि मागील आठवड्यात या जाहिरातीतून ते बाहेर पडले आहेत. जेव्हा या जाहिरातीशी ते जोडले गेले तेव्हा त्यांनी ती ‘सरोगेट जाहिरात’ श्रेणीत असल्याचे माहित नसल्याचे कंपनीला सांगण्यात आले. अमिताभ यांनी पुढे या निवेदनात ब्रॅण्डशी करार मोडून प्रमोशनसाठी मिळालेली रक्कम देखील परत केल्याचे सांगण्यात आले आहे. सरोगेट जाहिरातीची श्रेणी म्हणजेच सिगारेट, तंबाखू सारख्या जाहिराती ज्यांच्यावर बंदी आहे किंवा जी ठराविक वयोगटासाठी आहे असा होतो.