दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला बीएसएनएल फोर जी पहिला कॉल

केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटर वरून बीएसएनएल फोर जी नेटवर्क वरून पहिला कॉल केल्याचे जाहीर केले आहे. ते म्हणतात,’ बीएसएनएलच्या भारतात विकसित आणि डिझाईन केलेल्या ४ जी नेटवर्क वरून पहिला कॉल केला. हे नेटवर्क मेड इन इंडिया असून पंतप्रधान मोदी यांचे ‘आत्मनिर्भर भारत’ व्हिजन साकार होत असल्याचे उदाहरण आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने टेलिकॉम सेक्टर मध्ये १०० टक्के परदेशी गुंतवणूक म्हणजे एफडीआयला परवानगी दिल्याचे जाहीर केले आहे. या अंतर्गत सर्व टेलिकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रम चार्जेस व एजीआर मध्ये चार वर्षे सवलत मिळणार आहे. अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात एका पत्रकार परिषदेत घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी मोदी मंत्रीमंडळाने एकूण २५ स्ट्रक्चरल रिफॉर्म मंजुरी दिल्याचे आणि पाच प्रोसेस रिफॉर्मना सुद्धा मंजुरी दिल्याचे सांगितले होते. केंद्राने त्यावेळी १८ ते २४ महिन्यात बीएसएनएल फोर जी सेवा सुरु होऊ शकते असे संकेत दिले होते. बीएसएनएलच्या रीव्हाईव्ह प्लॅनला २०१९ मध्ये केंद्राने मंजुरी दिली होती.