दुबईत प्रथमच होणार ‘मिस युनिव्हर्स युएई’ स्पर्धा

संयुक्त अरब अमिराती प्रथमच ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धात सहभागी होत असल्याची घोषणा झाली आहे. यासाठी दुबई मध्ये पहिली ब्युटी कॉन्टेस्ट ‘मिस युनिव्हर्स युएई’ चे आयोजन होणार आहे. या संदर्भातील घोषणा मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन आणि युगेन इंव्हेंट तर्फे बुर्ज खलीफाच्या आसमानी रेस्टॉरंट मध्ये केली गेली आहे. यासाठीची अर्ज आणि निवड प्रक्रिया ७ ऑक्टोबर पासून सुरु होत असून अधिकृत वेबसाईटवरच यासाठी नोंदणी करता येणार आहे. विशेष म्हणजे सध्या युएई मध्ये वास्तव्यास असलेल्या कोणत्याही देशाच्या १८ ते २० वयोगटातील युवती त्यासाठी नोंदणी करू शकणार आहेत.

निवड झालेल्या उमेदवारांना १५ ऑक्टोबर रोजी वैयक्तिक फोन करून अल हबतूर पॅलेस मध्ये बोलाविले जाणार आहे. त्यातून ३० प्रतिस्पर्ध्यांची निवड केली जाईल आणि ३० ऑक्टोबर रोजी त्यांची नावे जाहीर केली जातील. या प्रतिस्पर्धी लाईव्ह शो मध्ये सहभागी होतील. अंतिम स्पर्धा ७ नोव्हेंबर रोजी अल हबतूर शहराच्या ला पार्ले मध्ये होणार असून तीन तासाच्या या स्पर्धेत अनेक राउंड होणार आहेत.

मेक्सिकोची अँद्रा मेझ सध्याची मिस युनिव्हर्स आहे. मिस युनिव्हर्स या स्पर्धेची सुरवात १९५२ मध्ये झाली असून जगातील ही सर्वात मोठी सौंदर्य स्पर्धा आहे. यंदा तिचे ७० वे वर्ष असून यंदाची स्पर्धा इस्रायलच्या इलात शहरात होणार आहे. १८० देशात या स्पर्धेचे प्रसारण केले जाणार आहे. फॉक्स टीव्ही कडे प्रसारणाचे हक्क आहेत.