बिग बी- ७९ व्या वर्षातही कमाईत बादशहा
बॉलीवूडचे शेहेनशहा अमिताभ बच्चन उर्फ बिग बी आज ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. ज्या वयात बहुतेक ज्येष्ठ व्यक्ती व्याज, पेन्शनवर जगतात त्या वयात बिग बी अभिनय, टीव्ही शो, जाहिराती मध्ये व्यस्त कलाकार म्हणून काम करत आहेत आणि कमाईचे नवे रेकॉर्डही बनवत आहेत.
कोलकाता येथे महिना ५०० रुपये कमाईवर सुरवात केलेले अमिताभ यांनी १९९९ मध्ये दिवाळखोरीची पायरी गाठली होती पण पुन्हा अशी उसळी घेतली की आज त्यांची नेटवर्थ ३ हजार कोटींची असून जगातील ते आठवे श्रीमंत कलाकार आहेत.
आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरवात सात हिंदुस्तानी पासून करणाऱ्या बिग बी यांना त्या चित्रपटासाठी ५ हजार रुपये मानधन मिळाले होते. हे वर्ष होते १९६९. त्यानंतर त्यांचे ओळीने आठ चित्रपट तिकीटबारीवर आपटले. १९७१ ला आलेल्या जंजीरने मात्र त्यांना पुन्हा हात दिला. त्यानंतर त्यांनी सुपरहिट चित्रपटांची जणू सिरीज सुरु केली. त्यावेळी ते हायेस्ट पेड कलाकार बनले होते. ब्लॉगब्लास्टर शोले साठी त्यांना १ लाख रुपये मिळाले होते तर त्यानंतर पाच वर्षांनी आलेल्या शान साठी हीच रक्कम ९ लाखांवर गेली होती.
खुदा गवाह या १९९६ मध्ये आलेल्या चित्रपटासाठी त्यांनी ३ कोटी रुपये मानधन घेतले होते असे सांगतात. आज कोणतीही भूमिका स्वीकारताना तिची लांबी, चित्रीकरणासाठी लागणारे दिवस यानुसार त्यांचे मानधन १५ ते २० कोटींच्या घरात आहे तर अतिशय आवडलेल्या कथानकासाठी ते मोफत काम करायची तयारी दाखवितात. इतकेच नव्हे तर चित्रीकरण, जाण्यायेण्याचा विमानासह सर्व खर्च स्वतः करतात असेही समजते.
कौन बनेगा करोडपतीचे यश आज सारेच पाहत आहेत. हा शो इतका यशस्वी होण्यात बिगबी यांचे योगदान फार मोठे आहे. ते या शोच्या एका एपिसोड साठी साडेतीन कोटी रुपये घेतात असे समजते. मुंबई सारख्या महागड्या महानगरात त्यांचे चार बंगले, काही फ्लॅट असून फ्रांस आणि अलाहाबाद येथेही त्यांची मालमत्ता आहे. सुमारे २० ब्रांडचे ते सदिछ्या दूत असून एका रिपोर्ट नुसार त्यांची ब्रांड व्हॅल्यु ३३० कोटी आहे.