अमित शहा म्हणतात…; अशिक्षित लोक देशावरचे ओझे


नवी दिल्ली – नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीला २० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने संसद टीव्हीतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुलाखत घेण्यात आली. अमित शहा यांनी या मुलाखतीत पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना एक महत्त्वाचे वक्तव्यही केले आहे. त्यांनी या मुलाखतीदरम्यान अशिक्षित लोक हे देशावरचे ओझे असल्याचे म्हटले आहे.

अमित शहा यांनी अशिक्षित लोकांना देशावरचे ओझे असे रविवारी झालेल्या या मुलाखतीत संबोधले असून ते कधीच चांगले नागरिक होऊ शकत नसल्याचे वक्तव्यही केले आहे. शहा या मुलाखतीत बोलताना म्हणाले, एक अशिक्षित व्यक्ती देशावरचे मोठे ओझे असते. कारण त्यांना ना संविधानाने दिलेल्या हक्कांची माहिती असते, ना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची. त्यामुळे अशिक्षित व्यक्ती एक चांगली नागरिक कशी होईल?

शहा पुढे बोलताना म्हणाले, नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा मुले शाळेत न जाण्याचे प्रमाण जास्त होते. मोदी यांनी एखाद्या उत्सवाप्रमाणे मुलांना शाळेत टाकण्याची मोहीम राबवली. त्यांनी पालकांची एक समिती तयार केली. शिक्षकांच्या जबाबदाऱ्या ठरवून दिल्या. याचा परिणाम असा झाला की, शाळेबाहेर असलेल्या मुलांचे प्रमाण ३७ टक्क्यांवरुन एक टक्क्याच्याही खाली आले.

शहा यांनी या मुलाखतीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीवर विश्वास असणारा नेता असे संबोधले आहे. ते म्हणाले की, टीकाकारही ही गोष्ट मान्य करतील की केंद्रीय मंत्रिमंडळ कधीही अशा पद्धतीने लोकशाही मार्गाने कार्यरत नव्हते, जसे काम हे मंत्रिमंडळ करत आहे.