नारायण राणेंनी चिपी विमानतळावरून शिवसेनेवर केलेल्या टीकेला विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर


मुंबई – मागील दोन दिवसांपासून राज्यातील वातावरण कोकणातील चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरून तापले आहे. नेमके कुणाचेचिपी विमानतळाचे श्रेय ? यावरून शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात दावे-प्रतिदावे होऊ लागले आहेत. शिवसेनेकडून कोकणात विमानतळासाठी जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली असताना दुसरीकडे नारायण राणेंनी चिपी विमानतळाचे पूर्ण श्रेय भाजपचे असल्याचा दावा केला आहे. शिवाय, उद्घाटनावेळी मोठा भांडाफोड करणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केल्यामुळे विमानतळाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू असताना आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर पलटवार केला आहे.

शिवसेनेकडून आणि विशेषत: विनायक राऊत यांनी केलेल्या पोस्टरबाजीवर नारायण राणेंनी निशाणा साधला होता. विनायक राऊत त्याविषयी बोलताना म्हणाले, प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधीची भूमिका बजावणाऱ्या आमच्यासारख्या सर्वांनाच आजचा आनंदाचा दिवस आहे. पोस्टरबाजी करण्याची शिवसेनेला गरज नाही. १९९९ साली विमानतळाची सुरूवात झाली. २००३ साली पहिले आणि २००९ साली दुसरे भूमिपूजन झाले. त्यांनी भूमिपूजन करण्याचे काम अनेकदा केले. पण खऱ्या अर्थाने विमानतळाच्या कामाला सुरुवात २०१६पासून झाली, असे विनायक राऊत म्हणाले.

दरम्यान, नारायण राणेंना यावेळी राऊत यांनी खोचक टोला देखील लगावला. स्वत: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी, भ्रष्टाचाराच्या चिखलात बुडालेल्यांनी इतरांवर आरोप करण्याचे धाडसच करू नये. गेल्या दोन वर्षांत ज्या पद्धतीने शिवसेनेने सिंधुदुर्गात काम केले आहे, ते पाहाता आम्ही केव्हाही पंचनामा करायला तयार आहोत. आम्हाला घाबरण्याचे कारण नाही, असे राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान चिपी विमानतळासाठी शिवसेनेने काहीही केले नसून त्यासाठीची परवानगी देखील आपणच आणल्याचा दावा नारायण राणेंनी केला आहे. विनायक राऊत त्यावर बोलताना म्हणाले, राज्यसभा खासदारकीची ४ वर्ष काढली, त्यात परवानगी घेण्यासाठी काय केले? टीका करायची की आनद घ्यायचा हे त्यांचे त्यांना कळले पाहिजे.