आर्यन खानच्या अटकेनंतर ‘या’ ब्रँडचे कोट्यावधींचे नुकसान; शाहरूखसोबतचा करार मोडणार?


ड्रग्स प्रकरणात मुलगा आर्यन खानला अटक झाल्यानंतर आता नव्या अडचणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान समोर उभ्या ठाकल्या आहेत. आर्यन खानला अटक झाल्यानंतर एका मोठ्या ब्रँडने शाहरुख खान सोबतचे संबंध तोडल्याचे वृत्त समोर येत आहे. या ब्रँडने एडवांस पेमेंट दिल्यानंतर देखील शाहरुख खानच्या जाहिराती बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. शाहरुख खानच्या मोठ्या प्रोजेक्टस पैकी हा एक प्रोजेक्ट असल्याचे म्हंटले जात आहे.

यासंदर्भात इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार काही जाणकारांनी सांगितले की, गेल्या काही दिवसात ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एडटेक स्टार्टअप या कंपनीला मोठ्या ट्रॉलिंगचा सामना करावा लागला. त्यांनी यानंतर जाहिरातींसाठी ॲडव्हान्स बुकिंग होऊन देखील शाहरुख खानच्या जाहिराती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय बायजू या ब्रॅण्डने घेतल्याचे कळते. शाहरुखसोबतचा करार बायजू हे लर्निंग अॅप मोडणार असल्याच्या चर्चा आहे. पण यावर भाष्य करण्यास बायजू ॲपच्या प्रवक्त्यांनी नकार दिल्याचे वृत्त समोर आले आहे.

शाहरुख खान 2017 सालापासून बायजू या लर्निंग ॲपचा ब्रँड ॲम्बेसिडर आहे. शाहरुख खानला यासाठी प्रतिवर्षी तीन ते चार कोटी रुपयाचे मानधन मिळत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शाहरुख खान सोबतचे सर्व प्रमोशन्स बायजूने सध्या बंद केले आहेत. हे ॲप शैक्षणिक क्षेत्राशी जोडले गेलेले असल्यामुळे त्यांना शाहरुख खानची संबंधित कोणत्याही वादांमध्ये अडकायचे नाही. त्यामुळे हे प्रमोशन म्हणजेच जाहिराती तात्पुरत्या थांबवण्यात आल्या आहेत. या ब्रँडने शाहरुख खान सोबतचा करार तोडल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण सध्या ब्रँडने जाहिराती थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

एका आठवड्यापूर्वीच शाहरुखसोबत नवी जाहिरात बायजूने सुरु केली होती. तसेच आयपीएलसाठी देखील बायजूने काही जाहिरातींची योजना आखली होती. पण या सर्व जाहिरातींमधून आता ते माघार घेणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.