फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम बंदचा ‘पॉर्न हब’ला झाला फायदा


सोमवारी रात्री म्हणजे ४ ऑक्टोबर रोजी फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम ही लोकप्रिय समाजमाध्यमे ठप्प झाल्यामुळे भारतासह जगभरातील त्यांचे कोट्यावधी वापरकर्ते अस्वस्थ झाल्याचे पहायला मिळाले. जागतिक स्तरावर खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेच्या तब्बल सहा तासांनंतर तिन्ही सेवा हळूहळू पुर्वपदावर आल्या.

फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गला या साऱ्या गोंधळामध्ये एवढा मोठा फटका बसला की तो श्रीमंतांच्या यादीमधून एक स्थानी खाली घसरला. पण त्याचवेळी पॉर्न हब या वेबसाईटला या फेसबुक शटडाऊनचा फायदा झाल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भातील माहिती पॉर्न हब या कंपनीनेच दिली आहे.

फेसबुक आणि इतर सेवा सोमवारी जगभरामध्ये सहा तास बंद होत्या, त्यावेळेस पॉर्न हबवरील युझर्सच्या संख्येमध्ये तब्बल १०.५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे. म्हणजेच फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम या सेवा जगभरामध्ये सहा तास बंद असताना पॉर्न हब वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या तब्बल १५ लाखांनी वाढल्याचे पहायला मिळाले.

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम बंद असताना आमच्या वेबसाईटसंदर्भातील ४ ऑक्टोबरच्या डेटामध्ये जग काय करत होते हे समोर आल्याच्या कॅप्शनसहीत पॉर्न हबने एक ग्राफ शेअर केला आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम बंद असताना दर तासाला येणाऱ्या युझर्समध्ये वाढ झाल्याचे वाक्य देखील या ग्राफवर आहे.


फेसबुकने देखील या साऱ्या गोंधळाबद्दल नंतर स्पष्टीकरणही दिले आहे. फेसबुक व त्यांच्या इतर सेवा अनेक तासांसाठी ठप्प होण्याचे कारण, दैनंदिन देखभालीदरम्यान झालेली एक चूक होती, असे फेसबुकने सांगितले आहे. तर फेसबुकचे उपाध्यक्ष (इन्फ्रास्ट्रक्चर) संतोष जनार्दनन यांनी ब्लॉग पोस्टमध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप ठप्प पडणे कुठल्याही आकसपूर्ण कृतीमुळे झाले नव्हते, तर ती चूक आमच्याकडूनच झाली होती, असे लिहिले आहे. अभियंते फेसबुकचे जागतिक बॅकबोन नेटवर्क, संगणक, राऊटर्स आणि जगभरातील डेटा सेंटरमधील सॉफ्टवेअर यांच्यासह त्यांना जोडणाऱ्या फायबर- ऑप्टिक केबल यांच्या दैनंदिन देखभालीचे काम करत असताना ही समस्या उद्भवली होती.

दैनंदिन देखभालीच्या या कामांपैकी एका कामादरम्यान ग्लोबल बॅकबोन क्षमतेचे मूल्यमापन करण्याच्या हेतूने एक कमांड देण्यात आली व त्यामुळे नकळत आमच्या बॅकबोन नेटवर्कमधील सर्व जोडण्या बंद झाल्या. परिणामी जगभरातील फेसबुक डेटा सेंटर्स बंद पडले, असे जनार्दनन यांनी म्हटले आहे.

फेसबुकच्या यंत्रणांमध्ये अशा प्रकारच्या चुका शोधून काढण्याची सोय आहे, तथापि या प्रकरणात ऑडिट टूलमधील एक बगने कमांड योग्य रीतीने थांबवण्यापासून त्यांना रोखले, असाही खुलासा जनार्दनन यांनी केला. या बदलामुळे आणखी एक समस्या उद्भवली, जिच्यामुळे फेसबुकचे सर्व्हर कार्यरत असतानाही त्यांच्यापर्यंत पोहचणे शक्य झाले नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.