दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र कोविड योद्धा सन्मान प्रदान


मुंबई : कोरोनाच्या कठीण काळात डॉक्टर, नर्सेस, समाजसेवक, शासकीय अधिकारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आदी सर्वांनी अंतःकरणपूर्वक प्रशंसनीय काम करून कोरोनावर मात केली. मात्र कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. यासाठी मास्क परिधान करणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी नियम सातत्याने पाळल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका राहणार नाही, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

अभिनेत्री दीपाली भोसले यांच्या दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारे ‘महाराष्ट्राचा कोविड योद्धा सन्मान’ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ८) राजभवन येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख, नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ रमेश भारमल, कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शैलेश मोहिते, मीरा भायंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांसह समाजातील विविध कोरोना योद्ध्यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या ‘डीबीएस महिला पथक’ या महिलांच्या बाऊंसरच्या पथक निर्मितीची घोषणा राज्यपालांच्या उपस्थितीत करण्यात आली.