पाठांतर करून बोलणे वेगळे आणि आत्मसात करून तळमळीने बोलणे वेगळे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


चिपी – आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यात सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ उद्घाटन समारंभात पुन्हा एकदा जोरदार शाब्दिक टोलेबाजी पाहायला मिळाली. आज हे दोघे दिग्गज अनेक दिवसानंतर एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा हे दोघे नेमके काय बोलणार याकडे लागल्या होत्या, अखेर नारायण राणेंनी केलेल्या भाषणानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणातून जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी जोरदार टोलेबाजी केली. जे काही आधी बोलून गेले आहेत, विकासाच्या गोष्टी त्या मी परत नाही सांगणार. पण जेव्हा मी एरियल फोटोग्राफी करत होतो, महाराजांचे किल्ले, आता किल्ले म्हणजे … माझा समज असा आहे की, निदान सिंधुदुर्ग किल्लातरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाही कोणीतरी बोलेल मीच बांधला, असेही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवले.

मुख्यमंत्री आपल्या भाषणात पुढे म्हणाले, मला वाटते आजचा क्षण आदळ आपट करण्याचा नाही. तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. ज्योतिरादित्यजी मी तुमचे खास अभिनंदन करतो. कारण तुम्ही एवढे लांब राहून देखील मराठी मातीचे संस्कार विसरला नाही. माती एक संस्कार असतो, मातेचा एक संस्कार असतो आणि मातीच्या वेदना काही वेळेला मातीच जाणते. अनेक झाडं उगवतात त्यात काही बाभळीचे असतात, काही आंब्याचे असतात आता बाभळीची झाडे उगवली तर माती म्हणणार मी काय करू? जोपासावे लागते. माझ्यासाठी हा मोठ्या सौभाग्याचा दिवस आहे. कारण, शिवसेना आणि कोकण हे नाते मी काय तुम्हाला सांगायला नको. मी अनेकदा म्हटले आहे की कुठेही न झुकणारे मस्तक ते या सिंधुदुर्गात कोकणवासियांसमोर नतमस्तक झाले ते शिवसेनाप्रमुख.

तसेच, कोणी काय केले, कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्या विषयावर बोलायचे तर खूप बोलता येईल, मी बोलेनही कदाचित पण आजचा हा महत्वाचा दिवस आहे. आपले कोकणचे महाराष्ट्राचे वैभव, जी संपन्नता आहे. ती आज आपण जगासमोर नेत आहोत. जगातील अनेक पर्यटक आणि त्या सुविधांमधळा सगळ्या मोठा भाग असतो तो, विमानतळांचा आणि त्या विमानतळाचे लोकार्पण आज झाले असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

त्याचबरोबर पर्यटन म्हटल्यावर आपल्या समोर साहाजिकच राज्य येते ते आपल्या शेजारचे राज्य गोवा. गोव्याच्या विरोधातील आपण नाही आहोत. पण आपली जी काय संपन्नता आहे, वैभव आहे, ऐश्वर्य आहे. ते ही काही कमी नाही. काकणभर सरस आहे. कमी तर अजिबातच नाही. मग सुविधा काय आहे तिकडे. एवढे वर्ष विमानतळाला का लागले एवढी खऱडीघाशी भांडी घाशी का करावी लागली? मग हे सरकार आल्यावर ते कसे मार्गी लागले?

पर्यटन, पर्यंटन, पर्यटन… आजपर्यंत अनेकजण येऊन गेले होते की आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करू आणि तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते की, कॅलिफोर्नियाला अभिमान वाटेल, असे कोकण मी उभे करेन. आज पर्यटनाला उद्योगाचा दर्जा आपण दिलेला आहे. उर्वरित गोष्टी आदित्यने व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. पाठांतर करून बोलणे वेगळे आणि आत्मसात करून तळमळीने बोलणे वेगळे. मळमळीने बोलणे आणखी वेगळे असते. त्याबद्दल मी नंतर बोलेन, असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून यावेळी लगावल्याचे दिसून आले.