क्रूझ पार्टी आणि ड्रग प्रकरण : ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याचे नाव नवाब मलिकांनी केले जाहीर


मुंबई – सध्या राज्यात मुंबई क्रूझ पार्टी आणि ड्रग प्रकरणावरुन गदारोळ सुरू आहे. एनसीबीने ही कारवाई भाजपच्या आदेशावरुन करत असल्याचे आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहेत. एनसीबीकडून क्रूझवर करण्यात आलेली कारवाई ही बनावट असून भाजपचे काही पदाधिकारी यात सहभागी होते असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्याचबरोबर ताब्यात घेतलेल्या व्यक्तींपैकी तिघांना सोडून देण्यात आले आहे. त्यातील एक व्यक्ती भाजपच्या पदाधिकाऱ्याचा मेहुणा आहे, असा दावा मलिकांनी केला होता. आता या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव त्यांनी जाहीर केले आहे.

नवाब मलिकांनी आज आपल्या आरोपांसंदर्भातले पुरावे सादर करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी यावेळी बोलताना अनेक खुलासे केले. ते म्हणाले, एनसीबीच्या समीर वानखेडेंनी सांगितले की ८ ते १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पण खरे म्हणजे ११ जणांनाच ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील तिघांना सोडून देण्यात आले आहे. रिषभ सचदेवा, प्रतिक गाबा, आमिर फर्निचरवाला अशी सोडून दिलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

त्यापैकी प्रतिक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांचे नाव सुनावणीदरम्यान आले आहे. आर्यन खान तिकडे या दोघांच्या बोलावण्यावरुनच गेला होता. आमचा एनसीबीला प्रश्न आहे की, १३०० लोकांच्या जहाजावर आपण छापा टाकला. त्यापैकी ११ जणांना ताब्यात घेतले, त्यांची चौकशी केली. पण तुम्ही ज्या तीन लोकांना सोडले, त्याचे आदेश तुम्हाला कोणी दिले? आमच्या माहितीनुसार, दिल्ली ते महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी या तिघांना सोडण्याचा आदेश दिला.

ज्या तीन लोकांना या ड्रग्ज प्रकरणात सोडण्यात आले, त्यापैकी एक भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा मेहुणा असल्याचा आरोप मलिक यांनी याआधीही केला होता. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी या नेत्याचे नाव जाहीर केले आहे. ते यावेळी बोलताना म्हणाले, सोडून दिलेल्या तिघांपैकी रिषभ सचदेवा हा भाजप मुंबईचे माजी सरचिटणीस मोहित कंबोज उर्फ मोहित भारतीय यांचा मेहुणा आहे.