पुणे – ११ ऑक्टोबरपासून पुण्यामधील महाविद्यालये सुरू होणार आहेत. पण कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत, त्यांनाच वर्गात बसण्यास परवानगी असणार आहे. आता पुणे महापालिकेने या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेच्यावतीने आता महाविद्यालयांमध्येच लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महाविद्यालयातच दिली जाणार पुण्यातील विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस – मुरलीधर मोहोळ
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले की, लसीकरण न झालेल्या १८ वर्षांवरील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आपल्या पुणे महापालिकेमार्फत थेट महाविद्यालय परिसरातच लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. यासाठी लवकरच आपण विशेष मोहीम राबवत आहोत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महाविद्यालये सोमवारपासून (११ ऑक्टोबर) सुरू करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी मान्यता दिली. अजित पवार म्हणाले, की पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून महाविद्यालये सुरू केली जातील. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार असून, बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे.