महिला टी-२० सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा ४ गडी राखून पराभव


नवी दिल्ली – दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत भारतीय महिला क्रिकेट संघाला फलंदाजी करण्यास सांगितले. ९ गडी गमवून भारताने ११८ धावा केल्या आणि विजयासाठी ११९ धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ४ गडी आणि ५ चेंडू राखून पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडून ताहिला मॅक्ग्राथने नाबाद ४२ धावांची खेळी केली. तर तिला जॉर्जिय वारहम चांगली साथ मिळाली.

एलिसा हीली आणि बेथ मूनी ही जोडी मैदानात उतरली. पण शिखा पांडेने पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एलिसा हीली हीचा त्रिफळा उडवला. अवघ्या ४ या धावसंख्येवर ती तंबूत परतली. त्यानंतर बेथ मूनी आणि मेग लेनिंगने डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी ३१ धावांची भागीदारी केली. राजेश्वरी गायकवाडने मेग लेनिंगला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेली एश गार्डनरही तग धरू शकली नाही. राजेश्वरी गायकवाडच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्यानंतर एलिस पेरीही बाद झाली. दीप्ती शर्माने तिला तंबूचा रस्ता दाखवला. तर बेथ मुनीला बाद करत राजेश्वरीने तीन विकेट्स घेतल्या. निकोला कॅरी बाद झाल्याने ऑस्ट्रेलियावर दडपण वाढले. पण ताहिला मॅक्ग्राथ आणि जॉर्जिया वारहमने विजय मिळवून दिला.

भारताच्या फलंदाजीची सुरुवात अडखळत झाली. स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा स्वस्तात बाद झाल्या. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सही जास्त वेळ मैदानात तग धरू शकली नाही. १३ चेंडूत ७ धावा करून बाद झाली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने संघाची बाजू सावरली. २० चेंडूत २८ धावांची खेळी केली. पण हिलीने तिला वारहमच्या गोलंदाजीवर यष्टीचीत केले. ती तंबूत परतत नाही, तिथपर्यंत यास्तिक भाटिया धावचीत झाली. रिचा घोषही कमाल करू शकली नाही. २ या धावसंख्येवर असताना तिला कॅरेने त्रिफळाचीत केल्यानंतर तळाच्या शिखा पांडे आणि रेणुका सिंगही त्रिफळाचीत होत तंबूत परतल्या. तर पूजा वस्त्राकार एकाकी झुंज देत २६ चेंडूत ३७ धावा केल्या. या खेळीत ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.