यामुळे त्या लोकांना सोडून देण्यात आले; एनसीबीने सांगितले कारण


मुंबई – मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले. तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा या कारवाईत सहभाग असल्याचा आरोप केला. यानंतर आता एनसीबीने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. एनसीबीने यात सुरुवातीला या प्रकरणात कशी कारवाई झाली याची माहिती दिली आणि शेवटी एनसीबीवरील आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हणत फेटाळून लावले.

एनसीबी अधिकाऱ्याने म्हटले, एनसीबीवर करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे आणि पूर्वग्रहदुषित आहेत. अनेक वक्तव्य ही केवळ गृहितकांवर आधारित आहेत. एनसीबीची कारवाई आणि त्यासाठीच्या प्रक्रिया या कायद्याला धरुन आणि पारदर्शक आहेत आणि असतील. सर्व संशयित आणि आरोपींसोबत कायद्यानुसारच वर्तन केलं जाईल.

या कारवाईत एकूण ९ स्वतंत्र साक्षीदार आहेत. मनिष भानूशाली आणि के. पी. गोसावी हे त्यापैकीच आहेत. या कारवाईआधी एनसीबीवरील दोन साक्षीदारांसह ९ जणांना ओळखत नव्हते. हायप्रोफाईल व्यक्तींना अटक झाल्यामुळे या प्रकरणातील कोणतीही माहिती बाहेर लिक होऊ नये, यासाठी संबंधित आरोपींना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आले. याबाबतची माहिती न्यायालयातही माहिती देण्यात आली. आतापर्यंत १४ जणांची चौकशी करण्यात आली असून सर्वांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. सखोल चौकशीनंतर यापैकी ८ जणांना अटक करण्यात आले आणि इतरांना सोडून देण्यात आले, अशी माहिती एनसीबीने दिली.

एनसीबी म्हणाली, या प्रकरणाच्या घटनास्थळावर पंचनामा देखील केला. तो न्यायालयात सादर केला जाईल. अटक करण्यात आलेल्या ८ जणांना न्यायालयाने कोठडी दिली आहे. ते सध्या ऑर्थर रोड तुरुंगात १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. एनसीबी एक निष्पक्ष संस्था आहे. ही संस्था देशाला नशामुक्त करण्यासाठी काम करत आहे. लोकांकडून मिळालेली आणि गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीवर आम्ही काम करतो, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या कारवाईत दोन साक्षीदारांचाही समावेश एनसीबीला करावा लागतो. या साक्षीदारांची माहिती मिळवणे आणि तपासणी करणे अवघड असते. कारण त्यावेळी आमचा प्रमुख उद्देश ड्रग्ज जप्त करणे आणि कारवाई करण्यावर असतो. या कारवाईत एकूण ९ साक्षीदार सहभागी झाले. यात मनिष भानूशाली आणि के. पी. गोसावी यांचाही समावेश होता. २ ऑक्टोबरच्या कारवाईआधी या सर्व साक्षीदारांना एनसीबी ओळखत नव्हती.

ज्यांना या कारवाईत अटक केली त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन या सर्वांना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आले. त्यांची चौकशी करताना सर्वांसोबत न्यायसंगत वर्तन करण्यात आले. त्यांच्या वकिलांनी देखील एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर याबाबत विश्वास व्यक्त केला आहे. त्याची न्यायालयातही नोंद आहे.

नवाब मलिक आरोप करताना म्हणाले होते, एनसीबीच्या समीर वानखेडेंनी सांगितले की ८ ते १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पण खरे म्हणजे ११ जणांनाच ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील तिघांना सोडून देण्यात आले आहे. सोडून दिलेल्या व्यक्तींची नावे रिषभ सचदेवा, प्रतिक गाबा, आमिर फर्निचरवाला अशी आहेत. त्यापैकी प्रतिक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांचे नाव सुनावणीदरम्यान आले आहे.

आर्यन खान तिकडे या दोघांच्या बोलावण्यावरुनच गेला होता. आमचा एनसीबीला प्रश्न आहे की, १३०० लोकांच्या जहाजावर आपण छापा टाकला. त्यापैकी ११ जणांना ताब्यात घेतले, त्यांची चौकशी केली. पण तुम्ही ज्या तीन लोकांना सोडले, त्याचे आदेश तुम्हाला कोणी दिले? आमच्या माहितीनुसार, दिल्ली ते महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी या तिघांना सोडण्याचा आदेश दिला.

ज्या तीन लोकांना या ड्रग्ज प्रकरणात सोडण्यात आले, त्यापैकी एक भाजपच्या पदाधिकाऱ्याचा मेहुणा असल्याचा आरोप याआधीही मलिक यांनी केला होता. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी या नेत्याचे नाव जाहीर केले आहे. ते यावेळी बोलताना म्हणाले, सोडून दिलेल्या तिघांपैकी रिषभ सचदेवा हा भाजप मुंबईचे माजी सरचिटणीस मोहित कंबोज उर्फ मोहित भारतीय यांचा मेहुणा आहे.

के .पी. गोसावी व भाजपचे पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे आर्यन खान व अरबाज मर्चंट यांच्या अटकेच्या वेळी उपस्थित होते व त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे? असा सवाल नवाब मलिक यांनी केला होता.

एनसीबीकडून क्रूझवर करण्यात आलेली कारवाई ही बनावट असून भाजपचे काही पदाधिकारी यात सहभागी होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच कारवाई करताना कायद्याचे पालन करण्यात आले नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. आरोप करताना एनसीबी फक्त सेलिब्रेटी आणि त्यांच्याशी संबंधित काही ठराविक लोकांवर कारवाई करत असून राजकीय दबाव असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले होते. समीर वानखेडे यांनी याला उत्तर देताना ते सर्व सरकारी कर्मचारी असून त्यांचे कर्तव्य बजावत असल्याचे सांगितले होते.