मलेरिया लसीचे भारत कनेक्शन

विकसनशील आणि अविकसित जगाला शाप बनलेल्या मलेरियावरील लसीला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे. या मलेरिया लसीचे भारत कनेक्शन असून भारतातील एकमेव कंपनी भारत बायोटेक सर्व जगासाठी या लसीचे उत्पादन भारतात करणार आहे. या लसीमुळे भारतासह आफ्रिकी देशात आशेचा नवा किरण दिसला आहे. आफ्रिकेत सर्वाधिक मलेरिया रुग्ण आढळतात आणि मलेरिया मुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या सुद्धा मोठी आहे.

वास्तविक ही लस दिग्गज फार्मा कंपनी ग्लॅक्सीस्मिथकलेन म्हणजे जीएसकेने विकसित केली आहे. या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळणे भारतासाठी चांगली वार्ता आहे. या कंपनीने भारताच्या भारत बायोटेक इंडिया लिमिटेड कंपनीला या लसीचे २०२९ पर्यंत उत्पादन करण्याचा ठेका दिला असून तसा करार नुकताच केला गेला आहे. भारत बायोटेकने करोना वरील पहिली स्वदेशी लस कोवॅक्सिन नावाने बाजारात आणली आहे.

मलेरिया लसीचे दीड कोटी डोस भारत बायोटेक मध्ये तयार होणार आहेत. भारतात सुद्धा मलेरियाचा प्रदुर्भाव होण्याचे प्रमाण मोठे असल्याने देशातच या लसीचे उत्पादन होण्यात आपला फायदा आहे. गेल्या दोन दशकात मलेरिया मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असले तरी मलेरिया लसीमुळे मलेरिया होण्याचे प्रमाण कमी होईल आणि लस घेऊन सुद्धा मलेरिया झाला तरी त्याचे स्वरूप फार गंभीर असणार नाही असे सांगितले जात आहे.

ही लस सुरवातीला फारशी यशस्वी झाली नव्हती मात्र २०१९ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने आफ्रिकेमध्ये या लसीच्या क्लिनिकल ट्रायल घेण्यास परवानगी दिल्यानंतर त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. आफ्रिकेत आठ लाख मुलांवर या चाचण्या केल्या गेल्या होत्या.