महाराजा पुन्हा टाटांच्या आश्रयाला आला

६८ वर्षांनंतर टाटा सन्सने तब्बल १८ हजार कोटींची बोली लावून एअर इंडियावर मालकी हक्क प्रस्थापित केला आहे. लिलावात सर्वोच्च बोली लावून हा हक्क कंपनीने मिळविला असून महाराजा पुन्हा टाटांच्या आश्रयाला आला अशी चर्चा सुरु झाली आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

जेआरडी टाटा यांनी १९३२ मद्ये टाटा एअरलाईन्स रुपात देशात पहिली विमान सेवा सुरु केली होती. स्वातंत्र्यानंतर या उड्डाण सेवेचे राष्ट्रीयीकरण झाले आणि तिचे नाव एअर इंडिया झाले मात्र जेआरडीचे या एअरलाईन्सवरचे प्रेम तसूभरही कमी झाले नव्हते. १९८० च्या दशकांपर्यंत ते एअरइंडियाशी जोडलेले होते आणि कंपनीच्या भल्यासाठी सतत कार्यरत होते.

टाटा एअरलाईन्सचा जन्मच मुळी जेआरडींच्या उड्डाण प्रेमातून झाला होता. ते फक्त भारतात पहिली विमान कंपनी सुरु करणारे उद्योजक नव्हते तर ज्यांना देशात पहिले फ्लाईंग लायसंस मिळाले अशी पहिली व्यक्ती होते. २४ व्या वर्षीच त्यांनी मुंबईत सुरु झालेल्या फ्लाईंग क्लबचे सदस्यत्व घेतले होते. असे रजिस्ट्रेशन करणारे ते पहिले नव्हते पण १९२९ मध्ये येथून उड्डाण परवाना घेऊन बाहेर पडणारे पहिले व्यक्ती होते.

१५ ऑक्टोबर १९३२ ही ऐतिहासिक तारीख ठरली कारण या दिवशी भारतीय इतिहासात पहिले विमान उड्डाण सुरु झाले. पुश मॉथ जातीच्या या विमानाने कराचीच्या एरोड्रमवरून उड्डाण करून मुंबई जुहू एअरस्ट्रीपवर लँडिंग केले त्याचे पायलट होते जेआरडी. पुढे या घटनेला ५० वर्षे झाल्यावर १९८२ मध्ये याच मार्गावर जेआरडी यांनी पुन्हा एकदा हा प्रवास केला होता. यातूनच एअर इंडिया, एअर इंडिया इंटरनॅशनलचा जन्म झाला. नंतर ही कंपनी सरकारी ताब्यात घेतली गेली.

तरीही जेआरडी अनेकदा या विमानातून प्रवास करत आणि त्या दरम्यान नोंदी काढत असत. काय सुधारणा हव्यात, प्रवाशांना वाईन कशी दिली जाते, एअरहोस्टेसची वर्तणूक कशी आहे, त्यांच्या साड्या, हेअरस्टाईल अश्या अनेक नोंदी ते करत असत. त्यांच्या काळात एअर इंडिया जगातील काही उत्तम एअरलाईन्स मध्ये गणली जात होती. आता पुन्हा एकदा तिचे भवितव्य टाटांच्या हाती आले आहे.