नाताळच्या तोंडावर ब्रिटनमध्ये अंतर्वस्त्रांची टंचाई

युके मध्ये नाताळ जवळ येत चालला असताना महागाईने कहर केला आहेच पण रोजच्या गरजेच्या वस्तू सुद्धा काळ्या बाजारातून अव्वाच्या सव्वा किमतीला खरेदी करण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. गेले काही दिवस पेट्रोल, किराणा यासारख्या वस्तू महामुश्किलीने मिळत असतानाच आता दुकानात अंतर्वस्त्रे दुर्मिळ झाली आहेत. नवीन मालाचा पुरवठा होत नाही परिणामी जुनाच माल दुकानदार चौपट किमतीला विकत आहेत असे समजते.

युके मध्ये सध्या अंडरवेअर्स, पायजमे प्रचंड महाग झाले असून १०० रुपयाची वस्तू ४०० रुपयांना विकली जात आहे. यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. इंडस्ट्री तज्ञांच्या मते नाताळ काळात बॉक्सर्स, महिलांची अंतर्वस्त्रे, पायजमे यांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. हा वादळचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. युके मधील हवामान बिघडले आहे. त्यामुळे कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. कापसाच्या किमती गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक असून त्यात ४० पटीने वाढ झाली आहे.

करोना काळात वाहतूक क्षेत्र ठप्प झाल्याने वाहतूक दर प्रचंड वाढले आहेत. ट्रकड्राईव्हर्स अत्यंत अपुऱ्या संखेने उपलब्ध असल्याने सुपरमार्केट पर्यंत माल पोहोचणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा होऊ शकत नाही. वाहतूक दरात ९०० पटीने वाढ झाल्याने सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यातच आता कपड्यांची टंचाई निर्माण झाल्याने वरील परिस्थिती उद्भवली आहे असे समजते.