‘क्या डिलीट करे?’ टाईम मासिकाच्या कव्हरवर फेसबुकला विचारणा
प्रतिष्ठित टाईम मॅगेझीनच्या या वेळच्या अंकाच्या मुखपृष्ठावर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गचा फोटो झळकला आहेच पण त्याचबरोबर अॅप डिलीट आयकॉन दाखवून वाचकांना डिलीट करायचे काय असा प्रश्न विचारला गेला आहे.
यावेळच्या फेसबुकवर केलेल्या कव्हर स्टोरी मध्ये टाईमने फेसबुक लहान मुलांना नुकसान पोहोचवत आहे असा दावा केला आहेच पण फेसबुकने युजर्सच्या सुरक्षेपेक्षा पैसे कमावण्यास अधिक प्राधान्य दिले असल्याचा दावा केला आहे. फेसबुकमधील माजी कर्मचारी आणि व्हिसलब्लोअर फ्रांसेस हॉगेन हिने फेसबुक संदर्भात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या आठवड्यात अमेरिकेतील खासदारांसमोर बोलताना हॉगेनने फेसबुकने युजर्सच्या सुरक्षेला चुना लावून नफा कमावण्यास कसे प्राधान्य दिले याचे खुलासे केले आहेत.
फेसबुक प्लॅटफॉर्मचा वापर हिंसा फैलावण्यासंदर्भातील योजना बनविण्यासाठी केला गेला पण त्याला प्रतिबंध करण्यासाठी कंपनीने कोणतीही भक्कम पावले टाकली नाहीत असे तिचे म्हणणे आहे. टाईममधील लेखात या सोशल मिडिया कंपनीच्या काही वादग्रस्त निर्णयांना विरोध करणाऱ्या टीम मधील अनेकांना बाजूला केले गेल्याचा आरोप केला गेला आहे. हे लोक फेसबुकवर चुकीची माहिती, द्वेष पसरविणारी माहिती याविरुद्ध लढत होते. पण ही टीम डिसेंबर २०२० मध्येच भंग केली गेली असा खुलासाही केला गेला आहे.
या नंतरच व्हिसलब्लोअर हॉगेनने कंपनीतील अंतर्गत हालचाली सार्वजनिक केले असून तिचे सर्व दावे मार्क झुकेरबर्ग याने फेटाळले आहेत असे समजते.