मुंबई विमानतळाला आले लोकल ट्रेन स्टेशनचे स्वरुप? कोरोना नियमावलीची पायमल्ली


मुंबई – कालपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्यामुळे गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी अनेक मुंबईकर आपल्या मुळ गावी निघाले आहेत. त्यामुळे आज सकाळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. गर्दी एवढी जास्त होती की विमानतळाचे टर्मिनल एखाद्या गजबजलेल्या रेल्वे स्टेशनसारखे दिसत होते. याबाबत मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या (एमआयएएल) एका अधिकाऱ्याने सांगितले की, या गर्दीचा आम्हाला अंदाज होता आणि त्यामुळे काही विमान कंपन्यांना सांताक्रूझ टर्मिनलवर हलवले होते. दरम्यान, या गर्दीमुळे काही प्रवाशांना त्यांच्या विमानापर्यंत पोहोचता न आल्याचाही प्रकार घडला आहे.

विमानापर्यंत या गर्दीमुळे न पोहोचू शकलेल्या प्रवाशांनी ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे. यामध्ये संगीतकार गायक विशाल ददलानीचाही समावेश आहे. याबाबत विशालने ट्विट केले आहे की, मुंबई विमानतळ खरच भंगार आहे. आपण अक्षरशः अंधारयुगात असल्याचे वाटत आहे. न संपणारी गर्दी, तुटलेल्या मशीन्स आणि सर्वत्र गोंधळ. विमानतळावरील कर्मचारी प्रयत्न करत आहेत, परंतु ही गर्दी सांभाळण्यात ते अयशस्वी ठरले आहेत. हा भोंगळ कारभार कोण चालवत आहे? त्यांना टॅग करा, असे विशाल म्हटले आहे.

तसेच या भोंगळ प्रकारावर 5 पैसा कॅपिटल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गगदानी यांनी देखील ट्विट केले आहे. मुंबई विमानतळावर खूप गोंधळ आहे आणि चेक इन करण्यासाठी किमान एक तास लागत आहे. त्यानंतर सिक्युरिटी चेकिंगसाठी ही गर्दी. अडीच तास आधी विमानतळावर पोहोचल्यानंतरही एखादी व्यक्ती फ्लाईट कशी पकडू शकते?, असा सवाल त्यांनी केला आहे.

याबाबत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, आम्ही विमानतळावर कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना विमानतळावर मदत करण्यास मी सांगेल. तसेच आता जाणारे प्रवासी हे कोरोनाबाधित होऊन येऊ शकतात, त्यामुळे त्यांनी सुरक्षित अंतर राखायला पाहिजे.